पंखे निर्मितीच्या जोरावर कंपनीच्या विद्युत उपकरण व्यवसायात निम्मा महसुली हिस्सा राखणाऱ्या हॅवल्स इंडियाने या गटातील श्रेणी विस्तारताना तंत्रज्ञान आणि नावीन्यतेची जोड देत यंदाच्या उन्हाळ्यासाठी स्मार्ट पंखे सादर केले आहेत.

ब्ल्यूटुथच्या साहाय्याने तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून (मोबाईल), रिमोटद्वारे पंख्यांची हाताळणी सुलभ करणारे तंत्रज्ञान हॅवल्सने विकसित केले आहे. असा प्रयोग करणारी हॅवल्स इंडिया ही देशातील पहिलीच कंपनी ठरली आहे.

कंपनीच्या हरिद्वार येथील उत्पादन प्रकल्पातून नव्या उपकरणांची निर्मिती केली जात असून येत्या महिन्यापासून हे नवे पंखे बाजारात उपलब्ध होतील. आशियाई बाजारपेठेतही या पंख्यांची निर्यात केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपनीने या गटात विविध ८ ते ९ प्रकारचे पंखे सादर केले आहेत. पंख्यांमध्ये दिवा, आठ पातीचा पंखा, नष्ट न होणारे आरेखन तसेच कोणत्याही कोनातून फिरणारे पंखे आदी त्यांची वैशिष्टय़े आहेत. ५७ टक्के अधिक ऊर्जा बचत करणारे आणि ३२ व्ॉटपर्यंतचे, वजनाने हलक्या अशा या पंख्यांची किंमत ३,००० ते ९,००० रुपयांपर्यंत आहे.

हॅवल्स इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष सौरभ गोयल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, नावीन्यता आणि तंत्रज्ञान आपल्या उत्पादनांमध्ये आणणाऱ्या कंपन्यांमध्ये हॅवल्स इंडिया नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कंपनीने तिची मधल्या व अव्वल गटातील पंखे श्रेणी विस्तारताना एकूण बाजारहिश्शाचे वाढीव लक्ष्य राखले आहे.

विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रातील ६,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या हॅवल्स इंडियाचा ५० टक्क्यांहून अधिक महसूल पंखे निर्मितीतून येतो. ६,५०० कोटी रुपयांची बाजारपेठ असलेल्या देशातील पंखे बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा १४ टक्के आहे. ५,००० हून अधिक मोठे विक्रेते आणि २ लाखांहून अधिक किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत.

एकूण पंखे क्षेत्रात छतासाठीच्या (सीलिंग) पंख्यांचा हिस्सा ७० टक्क्यांपर्यंत आहे. टेबल, एक्झॉस्ट आदींचा उर्वरित हिस्सा आहे. १,८०० रुपयेपर्यंत किंमत गटातील पंख्यांचा हिस्सा २१ टक्के आहे. हॅवल्स यापेक्षा अधिक किमतीतील पंखे तयार करत असून ती या गटात अव्वल आहे.

क्रॉम्प्टन ग्रिव्हज्, ओरिएन्ट, बजाज यांच्यानंतर हॅवल्स इंडियाचा क्रम लागत असून कंपनी वार्षिक १२ ते १४ टक्के वेगाने विस्तार करत आहे. तुलनेत पंखे निर्मिती उद्योगाची वाढ अवघी ६ ते ७ टक्केच आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात आकर्षकतेबरोबर सुलभता प्रदान करणाऱ्या पंख्यांना अधिक मागणी असेल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला आहे.