स्थावर मालमत्ता क्षेत्रातील लवासाच्या प्राथमिक खुल्या भागविक्री प्रक्रियेला मंजुरी मिळाल्याच्या वृत्ताने मंगळवारी तिची मुख्य प्रवर्तक हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या (एचसीसी) समभाग मूल्यात ८.५ टक्क्यांची भर घातली. मुंबई शेअर बाजारात एचसीसीचा समभाग व्यवहारात ३८.२५ (+१२.१७%) रुपयांपर्यंत गेल्यानंतर दिवसअखेर ७.७७ टक्क्यांनी (रु.३६.७५) वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात तो ८.४९ टक्क्यांनी वधारून ३७.०५ रुपयांपर्यंत गेला. एकाच व्यवहारात कंपनीचे बाजारमूल्य १७१.४१ कोटी रुपयांनी वाढून २,३७३.४१ कोटींवर गेले. लवासाने भागविक्रीसाठी जुलैमध्ये नव्याने सादर केलेल्या प्रस्तावाला सेबीन् ो अखेर मान्यता दिली. कंपनीने केलेला हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१० मध्ये कंपनीला २,००० कोटी रुपये उभारणीसाठी परवानगी मिळाली होती; मात्र भांडवली बाजारात पोषक वातावरण नसल्याने कंपनीने ही प्रक्रियाच राबविली नाही. आता सेबीकडे असलेल्या प्रस्तावानुसार कंपनी प्रत्येकी १० रुपये मूल्य समभागाद्वारे ७५० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. लवासा या नाममुद्रेखाली एचसीसी पुण्यानजीक १० हजार हेक्टर जागेवर निवासी गिरीशहर वसवू पाहत आहे. लवासात एचसीसीचा ६८.७२ टक्के हिस्सा आहे.