माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या एचसीएल टेक्नोलॉजीजने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दहा अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ७२ हजार ८०० कोटी रुपये कमाई झाल्याबद्दल सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ७०० कोटी रुपये विशेष बोनस देण्याची घोषणा केली. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

एचसीएल टेकने जारी केलेल्या पत्रकामध्ये फेब्रुवारीच्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांना हा विशेष बोनस देण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांना विशेष बोनस दिला जाणार असून कंपनीने मागील महिन्यामध्ये जारी केलेल्या २०२०-२१ च्या ईबीआयटीच्या (व्याज आणि कर पूर्व वेतन) निधीमध्ये या विशेष बोनसचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता.

एचसीएल टेक्नोलॉजीजने दिलेल्या माहितीनुसार २०२० मध्ये १० अब्ज अमेरिकन डॉलर कमाईचं टार्गेट पूर्ण झालं आहे. त्यामुळेच कंपनीने जगभरामधील वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनस म्हणून देण्यात येणारी एकूण रक्कम ही ७०० कोटी रुपयांची आहे. कंपनीने निश्चित ध्येय गाठल्याबद्दल साजरा करण्यात येणाऱ्या या आनंदाच्या क्षणी कंपनीकडून एक वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा दिवसाच्या कामाच्या वेतनाइतके पैसे बोनस म्हणून देण्यात येणार आहेत.

एचसीएल टेक्नोलॉजीजचे मुख्य एचआर असणाऱ्या अप्पाराव व्ही. व्ही. यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोना महामारीच्या कालावधीमध्येही एचसीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपली कामाप्रतीची निष्ठा आणि प्रेम दाखवलं आणि कंपनीच्या विकासामध्ये हातभार लावला. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार एचसीएलमधील पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख ५९ हजार ६८२ इतकी आहे.

कंपनीच्या रेव्हेन्यू कॅलेंडर इयर म्हणजेच आर्थिक वर्षामध्ये सन २०२० सालात कमाईचा १० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. वर्षिक स्तरावर ३.६ टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. कंपनीने आपले कर्मचारी ही कंपनीची मैल्यवान संपत्ती असल्याचं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कंपनीने आपल्या पत्रकामध्ये केवळ कर्मचारीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांचेही आभार मानले आहेत. आपण सर्वजण एकत्र मिळून हे यश साजरं करणार आहोत, असं कंपनीने म्हटलं आहे.