मुंबई : मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि नाशिक येथील एचडीएफसी लिमिटेड आणि समूहातील इतर कंपन्यांमधून ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी बुधवारी पाणी फाऊंडेशनच्या महाश्रमदानात सहभाग घेऊन योगदान दिले. राज्यातील २४ जिल्ह्य़ांमधील दुष्काळग्रस्त गावांमध्ये होत असलेल्या सत्यमेव जयते वॉटरकप २०१९ मध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रदिनी श्रमदान करावे, असे फाऊंडेशनकडून आवाहन करण्यात आले होते.

गेल्या वर्षीही एचडीएफसीच्या शाखांतील ३४० कर्मचाऱ्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला होता. गेल्या तीन वर्षांपासून एचडीएफसी ही भारतातील आघाडीची गृहवित्त कंपनी पाणी फाऊंडेशनच्या प्रमुख समर्थकांपैकी एक असल्याचे अभिनेते व पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनी सांगितले. एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले की, केवळ संस्थात्मक पातळीवर नव्हे तर वैयक्तिक पातळीवरदेखील दरवर्षी आमचे कर्मचारी अधिक मोठय़ा संख्येने सहभागी होऊन या लक्षणीय लोक चळवळीमध्ये आपले योगदान देत आहेत. गेल्या चार वर्षांत पाणी फाऊंडेशनची व्याप्ती राज्यातील तीनपासून ७६ तालुक्यांपर्यंत विस्तारली असून तिचे कार्य चार हजार गावांपर्यंत पोहचले आहे.

एचडीएफसीचे कर्मचारी श्रमदानाकरिता गराडे (पुणे), धोंडबार (नाशिक), खरसोळी (नागपूर) आणि खांडी पिंपळगाव (औरंगाबाद) येथे सहभागी झाले होते.