एचडीएफसी अर्गोमध्ये होणार विलिनीकरण

मुंबई : एचडीएफसी लिमिटेडने तिच्या आरोग्य विमा व्यवसाय विस्तार करताना अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स कंपनीतील निम्मा हिस्सा बुधवारी ताब्यात घेतला. १,३४७ कोटी रुपयांच्या या व्यवहारामार्फत ताब्यातील विमा कंपनीचे समूहातील एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्समध्ये विलिनीकरण होणार आहे.

एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख व अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्सच्या अध्यक्षा शोभना कामिनेनी यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत या व्यवसाय बदलाची घोषणा केली.

एचडीएफसी समूह अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्समधील मुख्य प्रवर्तक अपोलो हॉस्पिटल्सकडून ५०.८ टक्के तर कर्मचाऱ्यांकडील ०.४० टक्के हिस्सा अनुक्रमे १,३३६ कोटी रुपये व १०.८४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला. अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्समधील जर्मन कंपनीच्या म्युनिचचा हिस्सा होता.

विलिनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांचा मिळून या क्षेत्रातील हिस्सा ६.४ टक्के झाला आहे. तर देशभरात ३०८ शाखा व १०,८०७ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. अपघात व आरोग्य विमा क्षेत्रातील आता ही दुसरी कंपनी झाली असून या क्षेत्रातील ८.२ टक्के बाजारहिस्सा झाला आहे.

देशातील  वृद्गिंत आरोग्य विमा क्षेत्रासंबंधी आमच्या कटिबद्धतेला या व्यवहाराने अधोरेखित केले आहे. एचडीएफसी अर्गो आणि अपोलो म्युनिकच्या एकत्रित तज्ज्ञतेतून भविष्यात नवनवीन उत्पादने, विस्तृत वितरण जाळे आणि सेवा सक्षमतेत विस्ताराचे फायदे दिसून येतात.

’  दीपक  पारेख, अध्यक्ष, एचडीएफसी लि.