सह-व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा

मुंबई : एचडीएफसी बँकेचे सह-व्यवस्थापकीय संचालक परेश सुकथनकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांच्या नियोजित निवृत्तीनंतर त्यांचे वारसदार म्हणून सुकथनकर यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक पदत्यागाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एचडीएफसी बँकेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले सुकथनकर यांच्या पदत्यागाची माहिती शुक्रवारी सायंकाळी बँकेकडून भांडवली बाजाराला नियमानुसार सूचित करण्यात आली. शुक्रवारपासून ९० दिवसांची मुदत देऊन त्यांनी पदत्याग केला असल्याचा बँकेने खुलासा केला आहे. एचडीएफसी बँकेच्या १९९४ सालच्या स्थापनेपासून सुकथनकर यांची २४ वर्षांची कारकीर्द राहिली आहे. खासगी क्षेत्रातील या अग्रणी बँकेच्या घडणीत त्यांनी केलेल्या असामान्य योगदानाचा बँकेच्या संचालक मंडळाने कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. सुकथनकर यांना मार्च २०१७ मध्ये कार्यकारी संचालक ते बँकेचे सह-व्यवस्थापकीय संचालक अशी पदोन्नती देण्यात आली होता.

या राजीनाम्याबाबत विश्लेषकांमध्ये अनेक तर्कवितर्क आहेत. शिखा शर्मा यांच्या पश्चात अ‍ॅक्सिस बँकेचे रिक्त होणारे मुख्याधिकारी पद सुकथनकर यांना खुणावत असल्याचीही चर्चा आहे. शिखा शर्मा या येत्या डिसेंबरमध्ये अ‍ॅक्सिस बँकेवरून पायउतार होत आहेत. तर आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचरही त्यांच्या आरोपांची अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत बेमुदत काळासाठी रजेवर गेल्या आहेत.

तथापि एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मात्र, वैयक्तिक कारणासाठी सुकथनकर पायउतार होत असल्याचे नमूद करीत या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. पारेख यांच्या मते, सुकथनकर यांना आपण जितके ओळखतो ते पाहता ते कोणत्याही स्पर्धक बँकेच्या प्रमुखपदी रुजू होतील या शक्यतेला वाव नाही.

मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूटमधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केलेल सुकथनकर हे एचडीएफसी बँकेच्या सेवेत रूजू होण्यापूर्वी, नऊ वर्षे सिटिबँकेत कार्यरत होते.

परेश यांना आपण जितके ओळखतो ते पाहता ते कोणत्याही स्पर्धक बँकेच्या प्रमुखपदी रुजू होतील या शक्यतेला वाव नाही. माझ्या माहितीप्रमाणे वैयक्तिक कारणासाठी ते आपल्या पदावरून  पायउतार होत आहेत.

’ दीपक पारेख

अध्यक्ष, एचडीएफसी समूह