धनादेशाशी संबंधित व्यवहार मात्र महाग

ऑनलाइन माध्यमातून ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ व्यवहार करणाऱ्यांना कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने घेतला आहे. याचा लाभ बँकेच्या ग्राहकांना १ नोव्हेंबरपासूनच घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेने अन्य सेवांची शुल्क फेररचना केली आहे. त्यानुसार धनादेश निगडित व्यवहार अधिक महागडे ठरणार आहेत. याचीही अंमलबजावणी मात्र येत्या महिन्यापासून होणार आहे.

नोटाबंदीची वर्षपूर्ती होत असताना डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे.

बँकेच्या बचत तसेच पगारदार खातेधारकांनी ऑनलाइन माध्यमातून ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’द्वारे निधी हस्तांतरण व्यवहार केल्यास त्यांना कोणतेही शुल्क लागू होणार नाही. ‘आरटीजीएस’करिता सध्या २ ते ५ लाख रुपयेपर्यंतच्या व्यवहारासाठी प्रत्येकी २५ रुपये शुल्क लागते, तर ५ लाख रुपयांवरील व्यवहाराकरिता प्रत्येकी ५० रुपये लागतात. ‘एनईएफटी’द्वारे होणाऱ्या १०,००० रुपयांपर्यंतच्या रकमेकरिता २.५० रुपये तर त्यावरील मात्र एक लाख रुपयेपर्यंत ५ रुपये आणि एक ते दोन लाख रुपयेपर्यंतच्या व्यवहारांकरिता प्रत्येकी १५ रुपये शुल्क लागते. त्यावरील रकमेवर २५ रुपये शुल्क आकारले जाते.

नव्या बदलानुसार एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आता २५ पानी धनादेश पुस्तिका वर्षभरातून एकदाच मोफत मिळेल. सध्या वर्षभरात दोन धनादेश पुस्तिकांकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. २५ पानांच्या अतिरिक्त धनादेश पुस्तिकेकरिता ७५ रुपये आकारले जातील. खात्यात पर्याप्त रक्कम नसल्यास न वटणाऱ्या धनादेशापोटी प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यापूर्वी तिमाहीत असा एकदा धनादेश न वटल्यास ३५० रुपये दंड लागू होता. तिमाहीत पुन्हा असे घडल्यास ७५० रुपये दंडाची तरतूद होती.

एचडीएफसी लाइफची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया आजपासून

मुंबई : एचडीएफसी समूहातील दोन दशकातील पहिली प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या या भागविक्री प्रक्रियेचा मंगळवारी पहिला दिवस असेल.

यामाध्यमातून कंपनीमार्फत ८,६९५.०१ कोटी रुपये उभारले जाणार आहेत. प्रक्रियेकरिता कंपनीचे समभागाकरिता २७५ ते २९० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. याद्वारे एचडीएफसी ९.५२ टक्के तर स्टॅण्डर्ड लाईफ ५.४ टक्के हिस्सा उपलब्ध करून देणार आहे. प्रक्रियेकरिता २९.९८ कोटी समभाग उपलब्ध होतील. देशात आयुर्विमा क्षेत्राकरिता खासगी कंपन्यांना मुभा देण्यात आल्यानंतर २००० मध्ये एचडीएफसी समूह त्यात शिरकाव करणारा पहिला समूह आहे. गेल्या वर्षी एचडीएफसी लाईफ तसेच मॅक्स लाईफ व मॅक्स फायनान्शिअलबरोबरचे विलिनीकरण फिस्कटले होते.

चालू २०१७ मध्ये चार विमा कंपन्यांनी प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया राबविली आहे. त्यांच्यामार्फत ३५,००० कोटी रुपये उभारले गेले आहेत. तर बाजारातून आतापर्यंत एकूण ५७,००० कोटी रुपये उभारण्यात आले आहेत.