एचडीएफसी बँक या देशातील आघाडीच्या खासगी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०१८ पासून ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल. याबाबत बँकेने २२ ऑक्टोबरला मागितलेल्या परवानगीला रिझव्‍‌र्ह बँकेने होकार कळविला आहे. पुरी यांच्या पाच वर्षे नियुक्तीला बँकेच्या भागधारकांनी २०१५ मध्ये मंजुरी दिली होती.

मुख्याधिकारीपदाबरोबरच व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार पुरी यांच्याकडे २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत असेल. तेव्हा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करतील. अलिकडे दोन खासगी बँकांच्या प्रमुखांच्या कार्यकाल वाढवून देण्याबाबात रिझव्‍‌र्ह बँकेने कठोर भूमिका घेत, तशा प्रकारचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत, या

पार्श्वभूमीवर पुरी यांच्या फेरनियुक्तीला मिळालेली मंजुरी महत्त्वाची ठरते. बँक अस्तित्वात आल्यापासून पुरी हे एचडीएफसी समूहाबरोबर आहेत. कोणत्याही खासगी बँकेच्या प्रमुखपदावर सर्वाधिक काळ राहिलेले ते अधिकारी ठरले आहेत.