दोन वर्षांत १००० गावांच्या विकासाचे लक्ष्य

उम्पथाव. ईशान्य भारतातील मेघालय राज्यातील एक लहानसे गाव. वर्षांनुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या गावातील रहिवाशांना पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत होती; मात्र एचडीएफसी बँकेच्या सर्वंकष ग्रामीण विकास कार्यक्रमामुळे या गावाचा गेल्या सहा महिन्यांमध्ये कायापालट झाला असून आता प्रत्येक घरात नळ योजनेद्वारे २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच मुलांसाठी ‘स्मार्ट’ शाळा आणि स्वच्छतागृहेही उपलब्ध करण्यात आली आहेत.

एचडीएफसी बँकेकडून कंपनी सामाजिक दायित्व उपक्रमाअंतर्गत भारतातील १६ राज्यांमध्ये ‘परिवर्तन’ नावांर्तगत सर्वंकष ग्रामीण विकास कार्यक्रम (एचआरडीपी) राबविण्यात येत आहे. यातून विकासाचा लाभ घेणारे उम्पथाव हे ७५० वे खेडे आहे. २०१९ पर्यंत अशा एकूण १००० गावांमध्ये विकास कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. आतापर्यंत १६ राज्यातील १० लाख रहिवाशांना या योजनेमुळे फायदा झाला आहे. बँकेने गेल्या वर्षी सामाजिक उपक्रमांसाठी ३०५ कोटी खर्च केले होते. तर चालू वर्षांसाठी ३६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

एचडीएफसी बँकेच्या सामाजिक विकास उपक्रमांमध्ये ग्रामीण विकासाचा ‘परिवर्तन’ कार्यक्रम एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि उदरनिर्वाहाच्या साधनांची वाढ, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि अर्थसाक्षरता आणि सर्वसमावेशकता या पाच प्रमुख घटकांवर या कार्यक्रमात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

विकासाच्या दृष्टीने गावाच्या नेमक्या गरजा कोणत्या आहेत याची माहिती सुरुवातीला घेण्यात येते. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने यावर शाश्वत आणि प्रभावी पद्धतीने उपाय योजले जातात. स्थानिकांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते.

मेघालयमध्ये उम्पथावसह २१ गावांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून हा कार्यक्रम  सुरू आहे. येथे ‘सर्च’ आणि ‘आरोह’ या स्वयंसेवी संस्था बँकेबरोबर काम करीत आहेत. मेघालयात भरपूर पाऊस असूनही उम्पथावसह अनेक गावांमध्ये पाण्यासाठी रहिवाशांना पायपीट करावी लागते. उम्पथावमध्ये पहिल्यांदा या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यात आले. गावापासून दोन कि.मी.वर झऱ्याजवळ छोटे बंधारे बांधून तेथून गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आणण्यात आले. पाण्याच्या साठवणुकीसाठी बँकेने गावात पाच टाक्या बांधल्या आहेत. त्यायोगे गावातील प्रत्येक  घरात नळजोडणीद्वारे चोवीस तास पाणी पुरविण्यात येत असल्याचे ‘सर्च’च्या युगंधर मांडवकर यांनी सांगितले.

सर्वसमावेशक विकास साधावयाचा असेल तर शहरांच्या हातात हात घालून ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. त्या दिशेने सर्वंकष ग्रामीण विकास कार्यक्रमाद्वारे छोटय़ा खेडय़ांमध्ये  शाश्वत विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

’ परेश सुकथनकर उपव्यवस्थापकीय संचालक, एचडीएफसी बँक

ग्रामीण भागातील, एकूणच सामाजिक, आर्थिक परिस्थितीत सुधारणेसाठी वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण विकासाच्या योजनांच्या आखणी व अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांनाही विकासाच्या या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येत आहे.

’ नुसरत पठाण,

सामाजिक दायित्व विभागप्रमुख, एचडीएफसी बँक