देशातील सर्वात मोठी घरांसाठी कर्ज देणारी वित्तसंस्था ‘एचडीएफसी’ने शुक्रवारी आपल्या विद्यमान तसेच नवीन कर्जदार सुखावतील अशी घोषणा केली. एचडीएफसीचे गृहकर्ज आता ०.२० टक्क्यांनी स्वस्त होऊन ९.९ टक्के व्याजदराने मिळविता येणार आहे. ही कपात येत्या सोमवार, १३ एप्रिलपासून लागू होईल, असे एचडीएफसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
गेल्या मंगळवारी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रेपो दरात कोणतेही फेरबदल न करता, बँकांनीच आधी करण्यात आलेल्या ०.५० टक्क्यांच्या कपातीचे लाभ कर्जदार ग्राहकांपर्यंत पोहचावेत असा दट्टय़ा दिला होता. त्याला अनुषंगून बँकिंग अग्रणी स्टेट बँकेसह, खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस या प्रमुख बँकांनी ०.१५ ते ०.२५ टक्क्यांनी आपले किमान कर्जदर खाली आणले आहेत.
गृहकर्ज मिळविणारे सर्वाधिक ग्राहक असलेल्या एचडीएफसीच्या ताज्या कपातीने मात्र प्रत्यक्षात घरांसाठी घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता कमी झाल्याचा लाभ कर्जदारांना अनुभवता येईल.