News Flash

Coronavirus: घरांच्या किमती २० टक्क्यांनी घसरतील; दीपक पारेख यांनी वर्तवली शक्यता

करोनामुळे निवासी बांधकाम क्षेत्राला यावर्षी मोठा फटका बसेल असा अंदाज आहे

करोना व्हायरसमुळे उद्योगधंदे बंद असून अनेक क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला असल्याने आर्थिक नुकसान वाढत चाललं आहे. बांधकाम क्षेत्रालाही लॉकडाउनचा फटका बसलेला असून घरांच्या किंमती २० टक्क्यांनी घसरतील असा अंदाज एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या बेविनारमध्ये ते बोलत होते.

“नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलचा १० ते १५ टक्क्यांनी किंमती घसरतील असा अंदाज आहे. पण आपण २० टक्क्यांची तयारी ठेवली पाहिजे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. ज्यांची नोकरी सुरक्षित आहे किंवा पैसे आहेत त्यांच्यासाठी ही घर खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी आहे असं यावेळी ते म्हणाले. अनेक कारणांमुळे आधीच रिअल इस्टेट मार्केट अडचणींचा सामना करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

करोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असताना निवासी बांधकाम क्षेत्राला यावर्षी मोठा फटका बसेल असा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंगनुसार, निवासी बांधकाम क्षेत्राच्या मागणीत खूप मोठी घसरण होणार आहे. २०१७-१९ दरम्यान मागणीत चांगली वाढ दिसत होती.

दीपक पारेख यांनी बांधकाम व्यवसायिकांना मोरॅटोरिअमचा (भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या अधिस्थगन) पर्याय शेवटी वापरा असा सल्ला दिला आहे. तसंच आपलं लक्ष नवीन प्रोजेक्ट लाँच करण्यापेक्षा जे प्रोजेक्ट सुरु आहेत ते पूर्ण करण्यावर केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. “घरी कमी पैसे न्या, कंपनीत जास्त गुंतवा. घरखर्च कमी करा. खर्च करताना हात थोडा आखडता घ्या,” असं दीपक पारेख यांनी सांगितलं आहे.

दीपक पारेख यांनी २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था दोन टक्क्यांनी घसरेल असा अंदाज व्यक्त केला आहे. सोबत जी-२० देशांमध्ये भारत, चीन आणि इंडोनेशिया हे तीन देश सकारात्मक प्रगती करतील असंही म्हटलं आहे. दीपक पारेख यांनी स्टार्ट अपसंबंधी बोलताना भारत यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं. “स्टार्टअप्स खूप चांगली कामगिरी करतील आणि काही वेगळे उपाय काढतील असा मला आत्मविश्वास आहे. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे,” असं दीपक पारेख यांनी सांगितलं आहे.

दीपक पारेख यांनी यावेळी बांधकाम व्यवसायिकांना करोनानंतर कामगारांना लवकरात लवकर परत आणून काम सुरु केलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. तसंच त्यांना काही इन्सेन्टिव्ह दिला पाहिजे जेणेकरुन त्यांच्यासमोर अडचणी कमी होतील असंही म्हटलं आहे. राज्य सरकारला सल्ला देताना त्यांनी सांगितलं की, “सरकारने किमान काही वेळासाठी खासकरुन सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या स्टॅम्प ड्युटीवर सूट दिली पाहिजे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2020 7:57 am

Web Title: hdfc deepak parekh real estate prices may crash up to 20 percent sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीत वाढीची आर्थिक किंमत १८ हजार अब्ज रुपयांची
2 ‘ते’ सध्या काय करतात.?
3 आगामी सहा महिन्यांत सहा वेळा सुवर्ण रोखे विक्री
Just Now!
X