मुंबई : एचडीएफसी लाइफने करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसलेल्या एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत एकूण ७०,००० दावे निकाली काढले असून, पहिल्या लाटेदरम्यान कळसबिंदू ठरलेल्या मृत्यू-दाव्यांच्या तुलनेत यंदाच्या या सरलेल्या तिमाहीत मृत्यू-दाव्यांमध्ये तीन ते चार पटींनी वाढ दिसून आल्याचे स्पष्ट केले.

दुसऱ्या लाटेच्या प्रतिकूल परिणामामुळे एचडीएफसी लाइफचा तिमाही निव्वळ नफा मागील वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी गडगडून ३०२ कोटी रुपये नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाटेचा प्रभाव असतानाही, कंपनीने जून तिमाहीत ४५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला होता. यावर भाष्य करताना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्याधिकारी विभा पाडळकर म्हणाल्या, करोना महामारीचा परिणाम सर्वत्रच दिसून येत आहे. तरी नवीन व्यवसायाद्वारे हप्ते उत्पन्नात एचडीएफसी लाइफ भारतातील विमा उद्योगात पहिल्या क्रमांकावर असून, तिचा या आघाडीवर बाजारहिस्सा तिमाही कालावधीत २०.७ टक्क्यांवरून २२.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जून तिमाहीत वाढलेले मृत्यू-दावे पाहता कंपनीने मंजूर केलेले एकूण आणि नक्त दाव्यांचे प्रमाण हे अनुक्रमे १,५९८ कोटी रुपये आणि ९५९ कोटी रुपये आहे, असे त्या म्हणाल्या. पहिल्या लाटेच्या कालावधीत म्हणजे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीने सुमारे ३,००० कोटी रुपयांचे २,९०,००० मृत्यू-दावे निकाली काढले आहेत. गतिमान लसीकरणासह रुग्णसंख्याही लक्षणीय घसरत असली तरी यापुढे अपेक्षित दावे निकाली काढण्याच्या दृष्टीने ७०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.