सामाजिक कल्याणाच्या कार्याला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा आहे, पण पैशांचा वापर योग्य त्या कारणासाठी खरेच होईल काय, अशा प्रश्न-शंकेने दानशूर भंडावले जाणे स्वाभाविकच. तथापि कर-वजावटीचा लाभ म्हणून काही रक्कम दानकार्यात खर्ची घालण्याचा अनेकांचा मानस असतो. अशा मंडळींसाठी आदर्श ठरेल असा गुंतवणुकीचा पर्याय ‘एचडीएफसी डेट फंड फॉर कॅन्सर क्युअर २०१४’ने उपलब्ध करून दिला आहे.
गरीब कर्करुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत ‘इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस)’बरोबर सामंजस्य करीत एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडून दाखल झालेला हा तीन वर्षे कालावधीचा मुदतबंद (क्लोज एंडेड) फंड असून, त्यातून प्राप्त होणारा लाभांश पूर्णत: अथवा ५० टक्केथेट गरीब कर्करुग्णांसाठी देणगी स्वरूपात देण्याचा गुंतवणूकदारांना पर्याय दिला जाईल. तीन वर्षांनंतर गुंतविलेली रक्कम अधिक लाभांश (जर ५०% देणगीचा पर्याय निवडला असेल तर) गुंतवणूकदारांना सुरक्षितपणे परत मिळविता येईल, शिवाय प्राप्तिकर कलम ८०जी अन्वये करवजावटीचा लाभही प्राप्त होईल.
२०११मध्ये सर्वप्रथम या धर्तीचा पहिला फंड एचडीएफसी म्युच्युअल फंडाने आणला आणि तीन वर्षांत गुंतवणूकदारांकडून तब्बल १३ कोटी रुपयांचा लाभांश निधी या कार्यासाठी उभा राहिला आणि ज्याचे ५०० गरजू कर्करुग्ण त्याचे लाभार्थी ठरले. विद्यमान नव्या फंडातून दरसाल पाच कोटी रुपयांप्रमाणे तीन वर्षांत १५ कोटी आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडून समतुल्य योगदान जमेस धरून एकूण ३० कोटींचा कोष उभा राहील, असा विश्वास एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे यांनी व्यक्त  केला.
उल्लेखनीय बाब म्हणजे या लाभांश निधीच्या विनियोगावर, आयसीएस आणि एचडीएफसी एएमसीसह कर्करोग चिकित्सेतील निष्णात डॉक्टरांची दोनस्तरीय समितीकडून लक्ष ठेवते. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह देशभरातील अन्य सहा कर्करोगांवरील उपचार केंद्रातील गरीब रुग्णांची निवड (वार्षिक १ लाखांहून कमी उत्पन्न गटातील), त्यांच्यावरील उपचार खर्चाची निश्चिती वगैरे या समितीकडून ठरविली जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या समितीकडून मग उपचारासाठी योग्य तो निधी खुला केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी तज्ज्ञ डॉक्टर्सकडून शुल्कात माफी, तर एकूण प्रशासकीय खर्चही तीन-चार टक्क्यांदरम्यान राहील, यावर कटाक्ष असतो. शिवाय एचडीएफसी एएमसीकडून फंडावर कोणताही खर्च भार आकारला जात नाही, तर वितरकांचे कमिशन ते लाभांश-कराचा भारही एचडीएफसी एएमसीकडून उचलला जात असल्याने अधिकाधिक निधी दानकार्यासाठी उपलब्ध होतो, असे बर्वे यांनी स्पष्ट केले.

उद्योगांच्या सामाजिक दायित्वाविषयक कोणतेही बंधन नसताना तीन वर्षांपूर्वी वित्तीय सेवा क्षेत्रातून सेवाकार्यासाठी निधी उभारण्याच्या या अभिनव प्रयोगाला एचडीएफसी एएमसीच्या बडय़ा गुंतवणूकदारांकडून भरभरून पाठबळ मिळाले. सुमारे १३ कोटींचा निधी उभा केला गेला. आता पुढचे पाऊल टाकताना, गरजू कर्करुग्णांसाठी विनासायास मदतनिधी उभा राहील आणि उत्पन्नाला झळ न बसता, महत्त्वाच्या कार्याला हातभार लावल्याचे समाधानही गुंतवणूकदारांना मिळवून देणारा हा नवीन फंड खुला झाला आहे. लक्षणीय म्हणजे आधीच्या फंडाची कामगिरी ही क्रिसिल इंडेक्स फंड या मानदंडापेक्षा सरस राहील, अशी चोख व्यावसायिकता फंडाच्या व्यवस्थापनात एचडीएफसीने जपली आहे आणि ती नव्या फंडातही निश्चितच जपली जाईल.
’ मिलिंद बर्वे
व्यवस्थापकीय संचालक,
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी

‘एचडीएफसी डेट फंड फॉर कॅन्सर क्युअर २०१४’
(तीन वर्षे कालावधीची स्थिर उत्पन्न मुदतबंद फंड योजना)
* विक्रीसाठी खुला    : २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१४ पर्यंत
* मानांकन रंग श्रेणी    : निळा (गुंतवणूक मुद्दलास किमान जोखीम)
* गुंतवणूक उद्दिष्ट     : ‘ट्रिपल ए’ अथवा ‘ए-वन’ मानांकन  असलेल्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक
* गुंतवणूक पर्याय    : कर्करुग्णांच्या मदतीसाठी लाभांशातून ५०% अथवा १००% देणगी
* किमान गुंतवणूक     : रु. ५०,०००/-
* मुदतपूर्ती     :     १० मार्च २०१७
* मानदंड     :     क्रिसिल शॉर्ट-टर्म बाँड फंड इंडेक्स