23 July 2019

News Flash

विदेशात उच्चशिक्षण : विद्यार्थी विमा निवडीसाठी महत्त्वाच्या पायऱ्या

परदेशातील सरकार आणि विद्यापीठाची विम्यासंदर्भातील गरज समजून घ्या :

निखिल आपटे

परदेशात शिक्षणासाठी चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळणे ही तर केवळ सुरुवात आहे. ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील प्रत्येक चांगले विद्यापीठ विद्यार्थ्यांना त्यांनी ठरविलेल्या विमा कंपनीकडील आरोग्य विमा बंधनकारक करते. घरापासून दूर असताना परदेशात रुग्णालयांवर होणारा खर्च प्रचंड असतो व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे बजेट कोलमडू नये हे त्यामागील कारण आहे. शिक्षणासाठी परदेशात जाताना र्सवकष आरोग्य विमा काढून घेणे महत्त्वाचे ठरते.

योग्य विमा योजना निवडण्यासाठी या पुढील पायऱ्या उपयोगी ठरतील.

१) परदेशातील सरकार आणि विद्यापीठाची विम्यासंदर्भातील गरज समजून घ्या : ज्या देशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिता त्या देशातील सरकारच्या अटी समजून घ्या. त्यानंतर प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाची विमा योजना समजावून घ्या. नंतर या गरजा पूर्ण करणारी विमा योजना शोधा. जरी तुमच्या विद्यापीठाने विमा योजना बंधनकारक केली असेल तरी काही पर्याय असू शकतात. जसे की सूट मिळण्यासाठी अर्जाचा पर्याय किंवा विद्यार्थ्यांकडे पुरेसा वैद्यकीय विमा आहे हे दर्शविणारी कागदपत्रे जमा करावी लागू शकतात.

२) विम्याची किंमत- परदेशी विद्यार्थी आरोग्य विमा योजनेसाठी १.४ लाख ते २.८ लाख रुपये (दोन हजार ते चार हजार डॉलर) दरम्यान हप्त्याची रक्कम असते. त्या उलट र्सवकष विद्यार्थी परदेश प्रवास विमा भारतातून घेतला तर त्याचा हप्ता अगदी २० ते ३० हजार रुपयांदरम्यान (३०० ते ४३० डॉलर) असू शकतो. त्यामुळे वर्षांला सुमारे १.२ लाख ते २.५ लाख रुपये वाचतात, ज्याचा उपयोग सुट्टीमध्ये २-३ वेळा मायदेशात येण्या-जाण्यासाठी विद्यार्थी करू शकतात.

३) लाभांची तुलना : परदेशी विद्यार्थी आरोग्य विमा योजनेच्या तुलनेत भारतातून घेतलेला विद्यार्थी परदेश प्रवास विमा तुलनेने स्वस्त मिळतो आणि त्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मायदेशी आणणे, प्रायोजक संरक्षण, पासपोर्ट हरविणे, सामान हरविणे, सदिच्छा भेट किंवा लॅपटॉप हरविणे इ. यासारखे अतिरिक्त लाभही मिळू शकतात. हे लाभ कुठल्याही परदेशी विद्यापीठाच्या आरोग्य विमा योजनेत नाहीत.

दोन योजनांचे लाभ आणि किंमतीतील फरक याविषयी फारशी जागरूकता नसल्यामुळे पालकांना नाहक अतिरिक्त पैसे मोजण्याचा भरुदड पडतो.

(लेखक रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनीत मुख्य उत्पादन अधिकारी आहेत.)

First Published on March 14, 2019 5:19 am

Web Title: health insurance important when going abroad for education