प्रत्येकी २०५ ते २१८ किमतीला येत्या आठवडय़ात भागविक्री
हेल्थकेअर ग्लोबल इंटरप्राइज लि. (एचसीजी) या आण्विक ऊर्जा नियामक मंडळाकडून मान्यताप्राप्त खासगी कर्करोग उपचार केंद्रांची शृंखला चालविणाऱ्या डॉ. बी. एस. अजयकुमार यांनी प्रवर्तित केलेल्या कंपनीने भांडवली बाजारात प्रवेश प्रस्तावित केला आहे. येत्या १६ मार्च ते १८ मार्च २०१६ दरम्यान कंपनीच्या १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागांची प्रत्येकी २०५ रु. ते २१८ रु. या किंमतपट्टय़ादरम्यान बुक-बिल्डिंग प्रक्रियेने प्रारंभिक खुली भागविक्री योजण्यात आली आहे.
एचसीजी ही सध्या १४ निगा केंद्रांद्वारे सर्वसमावेश कर्करोग उपचाराच्या सुविधा पुरवीत असून, येत्या वर्षभरात त्यात आणखी १२ केंद्रांची भर पडणे अपेक्षित आहे. या नव्या विस्तारातून कंपनीच्या केंद्रातील खाटांची संख्या सध्याच्या ९०२ वरून दुपटीने वाढून १,८१७ वर जाईल ज्यायोगे वार्षिक ८० ते ९० हजार कर्करुग्णांना उपचार सुविधा पुरविता येऊ शकेल, असे डॉ. अजयकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवाय कर्करोग निगा केंद्राचे जाळे आफ्रिकेतही विस्तारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय वंध्यत्व उपचाराच्या सुरू झालेल्या नवीन सेवा दालनांचा कंपनी विस्तार करू पाहत आहे. सध्या असलेली चार केंद्रे पुढील सहा महिन्यांत दुप्पट म्हणजे आठपर्यंत विस्तारतील, असे डॉ. अजयकुमार यांनी स्पष्ट केले.
भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या साधारण २५३ कोटी रुपये निधीचा विनियोग मात्र प्रामुख्याने कंपनीवर असलेले बँकांचे १७० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी आणि कंपनीच्या सेवा केंद्रांतील माहिती-तंत्रज्ञान सुविधा अद्ययावत करण्यासाठी तसेच अत्याधुनिक वैद्यक उपकरणे व सामग्रींच्या खरेदीसाठी केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. अजयकुमार यांनी दिली. कंपनीने गत पाच वर्षांत सरासरी वार्षिक २५ टक्के दराने महसुली वाढ साधली आहे आणि नव्याने उभ्या राहिलेल्या केंद्रातूनही पहिल्या वर्षांतच या दराने महसुली वाढ दिसून आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.