बँकेतील मोठय़ा जमा रकमांवर जबर कर; सराफांचे व्यवहारही करांच्या जाळ्यात

केंद्र सरकारने २.५० लाख रुपयेपर्यंतच्या ५०० व १,००० रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करणाऱ्यांना कर सूट दिलासा दिला असतानाच मोठय़ा रकमेतील जमा रक्कम व सराफांचे मोठे व्यवहार कर जाळ्यात येऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

चलन विमुद्रीकरणानंतर बँकांमध्ये जमा होणाऱ्या मोठय़ा रकमेचा स्त्रोत न कळल्यास जबर दंड आकारण्याचा इशारा कर विभागाने दिला आहे. त्याचबरोबर ही कारवाई प्राप्तीकर विवरण पत्राच्या प्रक्रियेपूर्वीही करण्यात येऊ शकते, असेही सूचित केले आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, बँकांमध्ये मोठी रक्कम जमा करणाऱ्यांचा स्त्रोत त्यांच्या उत्पन्नाशी मेळ घालत नसल्यास अशा बँक खातेदार, ठेवीदारांना तब्बल २०० टक्के दंड लागू शकतो. त्याचबरोबर शून्य बचत खाते असलेल्या जन धन खात्यातही अशी चाचपणी केली जाऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा झाल्यानंतर विशेषत: सराफ्यांकडे ही रक्कम येण्याचे तसेच सोने विक्रीचे व्यवहार रात्री उशिरापर्यंत अचानक वाढले होते. यामुळे सोन्याचे दर किरकोळ विक्रेत्यांकडे काही तासातच तोळ्यामागे थेट ६० ते ७५ हजार रुपयांपर्यंतही गेले होते. मात्र २ लाख रुपये रकमेवरील सोने विक्री करताना संबंधित ग्राहकाचे पॅन नोंदवून घेतले नसल्यास अशा सराफ्यांवर कराचा बडगा उगारला जाईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी स्पष्ट केले.

चलन विमुद्रीकरणानंतरही बँकांमधील नव्या चलनाचा ओघ कायम आहे. याबाबत बँकांना नव्या नोटांची कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही. त्याचबरोबर बँकांच्या एटीएममधील नव्या नोटांची उपलब्धतताही लवकरच सुरळीत होईल. ग्राहकांना जुन्या नोटांद्वारे व्यवहार करणे सुलभ होण्यासाठी दिलेली सूट काही प्रमाणात विस्तारण्यात येत आहे.

शक्तिकांता दास, केंद्रीय अर्थव्यवहार सचिव.