आपल्या रुग्णांशी जोडण्यासाठी ‘हेल्पिंगडॉक’ने आरोग्यसेवा पुरवठादारांची यंत्रणा तयार केली असून, त्यांनी सिंगापूरच्या सीनियर मार्केटिंग सिस्टीम्स (एसएमएस)कडून १० कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. या नवीन निधीमुळे प्रत्यक्ष स्थानावरील चमूचे सबलीकरण केले जाणार असून, कंपनीचा तंत्रज्ञान पुरवठा मजबूत केला जाणार आहे.
नवीन निधीचा उपयोग ‘हेल्पिंगडॉक’च्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी केला जाणार आहे. या कंपनीच्या योजना दिल्ली परिसरापलीकडे, देशातील मुंबई, बंगळुरूसारख्या इतर मोठय़ा शहरांमध्ये येत्या दीड ते दोन वर्षांत पोहोचविल्या जाणार आहेत. त्याचे उद्दिष्ट हे ४ ते ५ पटींनी विस्तार करण्याचे असून पुढील दोन वर्षांत २० हजारांपेक्षा अधिक डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे. ‘हेल्पिंगडॉक’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित बन्सल याबाबत म्हणाले की, एसएमएस, सिंगापूरच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक ही केवळ वित्तीय व्यवहार नाही तर ती एका अर्थी डावपेचात्मकही आहे. त्यातून आम्हाला या क्षेत्रात ज्ञान वाढवण्याची संधी मिळेल आणि आशियातील इतर गुंतवणुकींमध्ये विस्तार करता येईल. या निधींमुळे आम्हाला वेगाने विस्तार करता येईल आणि आम्हाला अंतर्गत कार्य, प्रक्रिया आणि यंत्रणांचे मजबुतीकरण करण्यासाठी सुविधा मिळतील, असेही ते म्हणाले. एसएमएस, सिंगापूरचे संचालक जो हाताकेयामा म्हणाले की, भारतातील ऑनलाइन आरोग्यसेवा उद्योग अत्यंत सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुढील ३-५ वर्षांमध्ये त्यांच्याकडे वाढण्याच्या प्रचंड संधी आहेत. ‘हेल्पिंगडॉक’च्या संघाकडे दूरदृष्टी आहे आणि या उगवत्या उद्योगात ते एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी नमूद केले.