ज्येष्ठ उद्योगपती, हीरो सायकल्सचे अध्यक्ष आणि हीरो उद्योग समूहाचे संस्थापक ओम प्रकाश मुंजाल यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंजाल यांनी ६० वर्षे हीरो सायकलचे नेतृत्व केले.
मुंजाल यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी डीएमसी हीरो हार्ट सेंटरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून मुंजाल यांना विविध शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी व्यवसायातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुलगा पंकज मुंजालने ही प्रगती कायम राखताना हीरो मोटर्स ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
ओमप्रकाश मुंजाल यांनी ब्रिजमोहन लाल, दयानंद आणि सत्यानंद या तीन बंधूंसह अमृतसरमध्ये १९४४ मध्ये सायकल व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी १९५६ मध्ये लुधियानात स्थापित होऊन त्यांच्या सायकलला ‘हीरो’ ही नाममुद्रा बहाल केली. देशी बनावटीची सायकलची ही भारतातील पहिली नाममुद्रा ठरली. ८० च्या दशकात जगात सर्वाधिक प्रमाणात सायकली तयार करण्याचे कार्य हिरो सायकल कंपनीने केले.