होन्डा, टीव्हीएस, सुझुकी,पिआज्जिओच्या स्पर्धेत डेस्टिनी दाखल

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दुचाकी विक्री कंपनी असलेल्या हीरो मोटोकॉर्पने १२५ सीसी इंजिनच्या स्कूटर निर्मिती क्षेत्रात शिरकाव केला आहे. कंपनीने तिची या गटातील डेस्टिनी १२५ ही नवी गिअरलेस स्कूटर सोमवारी नवी दिल्लीत सादर केली.

काहीसा उशिरा या गटात प्रवेश करणाऱ्या हीरोची स्पर्धा याच गटात होंडाच्या अ‍ॅक्टिव्हा १२५, सुझुकीच्या एक्सेस १२५ तसेच टीव्हीएसच्या ज्युपिटर १२५ बरोबर असेल.

हीरो मोटोकॉर्पचे जागतिक उत्पादन नियोजन प्रमुख मालो मॅसन तसेच कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्क्स ब्राऊन्स्पेर्जर यांनी हे वाहन सादर केले. मंगळवारपासून ही दुचाकी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कंपनीच्या जयपूर (राजस्थान) येथील प्रकल्पात ही दुचाकी तयार करण्यात आली असून प्रति लिटर ५१ किलो मीटर तिची इंधनक्षमता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हीरोच्या नव्या डेस्टिनी १२५ दुचाकीची किंमत ५४,६५० ते ५७,५०० रुपयांपुढे आहे.  १२५ सीसी इंजिन गटातील गिअरलेस स्कूटरची बाजारपेठ वार्षिक तब्बल ७५ टक्क्यांनी वाढत आहे. महिन्याला सरासरी एक लाख दुचाकी या गटातून विकल्या जातात.

गिअरलेस स्कूटरबरोबरच मोटरसायकलचा बाज देणारा नवा वाहन प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये खरेदीदारांमध्ये अधिक रुढ होऊ लागला आहे. पिआज्जिओनेही नेमके हेच ओळखून तिच्या व्हेस्पा या स्कूटरबरोबरच अ‍ॅप्रिलिया ही नवागत दुचाकी सादर केली होती.

होंडाची ग्रॅझिआ, टीव्हीएसची एनटर्क तसेच महिंद्रची मॅस्ट्रो या गटात सध्या आहेत.