नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या जगातील सर्वात मोठय़ा दुचाकी उत्पादक कंपनीतर्फे नव्या ‘एक्स्ट्रीम २००आर’ मोटारसायकलचे सादरीकरण केले आहे. प्रिमीयम मोटारसायकल विभागात कंपनीचा पुनप्र्रवेश होत असून एक्स्ट्रीम २००आर ही हिरोच्या प्रीमिअम मोटारसायकलच्या यावर्षी सादर होणाऱ्या नव्या श्रेणीतील पहिलीच दुचाकी आहे. हिरो मोटोकॉर्प विक्रेत्याकडे एक्स्ट्रीम २००आर ही ८९,९०० रुपये (एक्स शोरूम दिल्ली) किंमतीत ती पुढील आठवडय़ापासून उपलब्ध आहे.

ग्रेटर नॉयडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये सोमवारी झालेल्या भारतातील स्थानिक बाजारपेठेतील कंपनीच्या विक्रेत्यांच्या बैठकीत हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाळ यांनी ही दुचाकी सादर केली.

यावेळी ते म्हणाले की,  आमच्यासाठी एक्स्ट्रीम २००आर म्हणजे कोणत्याही साधारण उत्पादनाचे केवळ सादरीकरण नाही तर यामुळे आम्ही परत प्रवेश करत आहोत. आतापर्यंत ज्या विभागात आमचा दबदबा होता आणि मोठय़ा प्रमाणावर बाजारपेठीय हिस्सा होता त्या विभागात आमचा हा पुनप्र्रवेश होत आहे.  तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन रचना केलेली एक्स्ट्रीम २००आर म्हणजे वेगाने वाढणाऱ्या या विभागात गांभीर्याने केलेला विस्तार आहे. आगामी सणांचे दिवस लक्षात घेऊन एक्स्ट्रीम २००आर बाजारपेठेत आघाडीवर जाण्यास मदत करेल.