News Flash

चालू खात्यातील तुटीला आवर तूर्तास अशक्य

चालू खात्यातील तूट हे देशावरील मोठे संकट असून ते येत्या दोन वर्षांत ही तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५ टक्क्यांवर आणले जाण्यासाठी रंगराजन यांनी आजवर जाहीरपणे

| July 24, 2013 01:11 am

चालू खात्यातील तूट हे देशावरील मोठे संकट असून ते येत्या दोन वर्षांत ही तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५ टक्क्यांवर आणले जाण्यासाठी रंगराजन यांनी आजवर जाहीरपणे आग्रही मतप्रदर्शन केले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास सहामाही शिल्लक असताना मात्र त्यांनी हे उद्दिष्ट पूर्ण होण्याबाबत शंका उपस्थित केली आहे.
आसाममधील तेजपूर विद्यापीठातील भारतीय सांख्यिकी संस्थेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात रंगराजन यांनी मंगळवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षांत ४.७ टक्के म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या तुटीचे प्रमाण कमी जरूर होईल; मात्र हे प्रमाण दिलासादायी ठरेल अशा २.५ टक्क्यांवर आणणे लवकर शक्य होईल असे वाटत नाही.  जागतिक अर्थव्यवस्थेबरोबरच  अनेक देशांची अर्थव्यवस्था सुधारत असून यामुळे निर्यातीला बळ मिळेल; मात्र सोने, कोळसा आणि तेलाची आयात वाढतच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या दोन वर्षांत तर या वस्तूंची आयात प्रचंड वाढली आहे, असे स्पष्ट करत त्यांनी मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्यास महागाई कमी होताना दिसेल, असेही सांगितले.
चालू आर्थिक वर्षांतील सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत मात्र रंगराजन यांचा आत्मविश्वास अधिक आहे. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने ५ टक्के तर खुद्द पंतप्रधानांनी विकास दर ६.५ टक्के गाठणार नाही, असे नमूद केलेले असतानाच रंगराजन यांना मात्र विकास दर ६ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास वाटतो. त्याला यंदाचा चांगला मान्सून, उत्पादन आणि पायाभूत सेवा क्षेत्रातील वाढ या कारणांची जोड त्यांनी दिली आहे.

२०१५ पर्यंत तरी ४%वरच राहील !
बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्च
चालू खात्यातील तूट आणि रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रयास सुरू असतानाच येती दोन वर्षे तरी या तुटीचे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेतील प्रमाण ४ टक्क्यांच्या वरच राहील, अशी भीती बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच या वित्तसंस्थेने व्यक्त केली आहे. तर डॉलरच्या तुलनेत अद्यापही दबावाच्या छायेत असणारा रुपया चालू आर्थिक वर्षअखेर ६५ चा तळ गाठेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
विदेशी चलनाच्या रूपातील गुंतवणूक आणि खर्च यांच्यातील दरी म्हणून ओळखली जाणारी चालू खात्यातील तूट विस्तारत असून २०१५ पर्यंत ती ४ टक्क्यांच्या वरच राहील, असे या विदेशी बँकेने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. डीएसपी मेरिल लिन्चचे भारतातील अर्थतज्ज्ञ इंद्रनील सेन गुप्ता यांनी तयार केलेल्या या अहवालात कमी विकास दर, कमी निर्यात, वाढती तेल आयात आदी तूट वाढण्याची कारणे देण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 1:11 am

Web Title: high current account deficit likely until 2015 bofa ml
टॅग : Business News
Next Stories
1 मूलपेशी चिकित्सांना लवकरच मिळेल आरोग्यविम्याचे कवच!
2 रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक पदावरून बिर्ला पायउतार
3 ‘सेन्सेक्स’ अडीच वर्षांच्या उच्चांकावर
Just Now!
X