नवी दिल्ली :सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या मालमत्तांच्या विक्रीबाबत मंगळवारी बैठक होत असून सरकारच्या निर्गुतवणूक मोहिमेनुसार त्याबाबतची चाचपणी केली जाणार आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालय, निती आयोग तसेच दीपम विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत सहभागी होतील. यानिमित्ताने एका कार्यशाळेचे आयोजनही केले जाणार आहे.

गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील विविध आजारी १०० मालमत्तांची विक्री करण्याचे स्पष्ट केले होते. या माध्यमातून २.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. यातील अनेक कंपन्या या तेल व वायू तसेच ऊर्जा क्षेत्रातील आहेत.

येत्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षांचा – २०२१-२२चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विद्यमान सार्वजनिक पायाभूत कंपन्यांच्या विक्रीतून नव्या पायाभूत बांधकामासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले होते. पायाभूत मालमत्तेसाठी राष्ट्रीय  कंपनी वाहिनी स्थापन करण्यात येणार आहे.