मुंबई :  व्यवसाय ठप्प असलेल्या जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदी प्रक्रियेत, विद्यमान भागीदार एतिहादबरोबरच हिंदुजा समूहानेही उत्सुकता दर्शविली आहे.

एतिहाद तसेच हिंदुजा समूहाची जेटमधील हिस्सा खरेदीच्या निर्णयासाठी गुरुवारी बैठक होत आहे. आबू धाबी येथे एतिहादच्या मुख्यालयातील बैठकीतून संयुक्तरूपात डावपेच आखले जाणार आहेत. जेटमध्ये भागीदारी मिळविण्यासाठी डार्विन समूहासह लंडनस्थित अदिग्रोनेही अखेरच्या टप्प्यात उडी घेतली असल्याचे समजते.

जेट एअरवेजकरिता हिंदूजांचे नाव पुढे आल्याने या नागरी हवाई वाहतूक कंपनीचा समभाग ५ टक्क्यांपर्यंत वाढला. गेले काही आठवडे निरंतर घसरण सुरू असलेल्या या समभागामध्ये बुधवारी अपवादात्मक खरेदी दिसून आली.  या सर्व घडामोडींचा वेग वाढला असतानाच भांडवली बाजारात सूचिबद्ध जेट एअरवेजचा समभाग बुधवारअखेर १५८.५५ रुपयांवर स्थिरावला.

‘स्पाईसजेट’चा देशांतर्गत उड्डाणविस्तार

मुंबई : जेट एअरवेज जमिनीवर असतानाच स्पर्धक स्पाईसजेटने घाऊक नवीन २० देशांतर्गत उड्डाणे घोषित केली आहेत. पैकी १८ उड्डाणे ही देशाची आर्थिक राजधानी मुंबईशी निगडित आहेत. मुंबईहून दक्षिणेतील थिरुअनंतपुरम, विजयवाडा, तिरुपती या शहरांना जोडणारी खासगी नागरी वाहतूक कंपनीची सेवा येत्या २६ मेपासून सुरू होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जेटचा व्यवसाय ठप्प होऊन महिना होत असतानाच स्पाईसजेटने १ एप्रिलपासून १०६ नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. दरम्यान, कंपनी समभाग बुधवारी एक टक्क्यापर्यंत वाढत १२७.९५ रुपयांवर स्थिरावला.