भारतीय ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार पूर्णत्वाला

आघाडीचा अँग्लो-डच उद्योग समूह असलेल्या यूनिलिव्हरने स्पर्धक ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचा भारतातील आरोग्य अन्न व पेय व्यवसाय खरेदी केला आहे. या व्यवहाराद्वारे यूनिलिव्हरचा आशियातील प्रामुख्याने २० देशांमध्ये विस्तार करता येईल. २७,७५० कोटी रुपयांच्या या व्यवहाराद्वारे भारतीय ग्राहक वस्तू क्षेत्रातील ताज्य सर्वात मोठा व्यवहार नोंदला गेला आहे. स्पर्धेत नेस्ले, कोकाकोला आदीही होते.

यूनिलिव्हरने तिच्या हिंदुस्थान यूनिलिव्हर या भारतातील कंपनीमार्फत ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचा जीएसके कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेड हा व्यवसाय खरेदी करत दोन्ही भारतीय कंपन्यांचे विलिनीकरण करण्याचे सोमवारी जाहीर केले. जीएसकेचा बांगलादेशातील व्यवसायातील ८२ टक्के हिस्सा खरेदीही केली आहे. भारता व्यतिरिक्त काही देशातील जीएसकेच्या काही मालमत्ताही यूनिलिव्हरच्या अखत्यारित आल्या आहेत.

हॉर्लिक्स, बूस्टसारखी उत्पादने आता यूनिलिव्हरच्या भारतीय व्यवसायांतर्गत येतील. याबाबतच्या विलिनीकरणाला उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने सोमवारी मंजुरी दिली. यानंतर जीएसके कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडच्या प्रत्येक समभागाकरिता हिंदुस्थान यूनिलिव्हर लिमिटेडचे ४.३९ समभाग भागधारकांना अदा केले जाणार आहेत.

या व्यवहारानंतर यूनिलिव्हर समूहाला अन्न व पेय उत्पादन व्यवसायात अधिक भक्कम स्थान प्राप्त करता येईल, असा विश्वास यूनिलिव्हरच्या या व्यवसाय विभागाचे  अध्यक्ष नितिन परांजपे यांनी व्यक्त केला. समूहाचा सध्या या गटातील व्यवसाय २,४०० कोटी रुपयांचा असून तो नव्या व्यवहारामुळे १०,००० कोटी रुपयांपर्यंत होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

जीएसकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इमा वॉल्मस्ले यांनी, समूह आता औषधनिर्मिती व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रीत करेल, असे जाहीर केले आहे. कंपनीची क्रोसिन, इनो, सेन्सोडाईन आदी नाममुद्रा आहेत. येत्या वर्षभरात यूनिलिव्हरबरोबरचा व्यवसाय हस्तांतरण व्यवहार पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले.

जीएसके समूहात हॉर्लिक्स, बूस्टसह विवा, माल्टोवा आदी नाममुद्रा आहेत. जीएसकेच्या भारतातील व्यवसायात ३,८०० मनुष्यबळ असून कंपनीचे उत्तर व दक्षिण भारतात दोन प्रकल्प आहेत. ते आता हिंदुस्थान यूनिलिव्हरच्या ताब्यात येतील. कंपनीने सप्टेंबर २०१८ अखेर ४०.६० कोटी पौंडची विक्री नोंदविली आहे.

विलिनीरण मंजुरीनंतर समभागांमध्ये उसळी

दोन आघाडीच्या कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर हिंदस्थान यूनिलिव्हर तेच ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचे समभागमूल्य जवळपास ४ टक्क्य़ांपर्यंत वाढले. हिंदुस्थान यूनिलिव्हरचा समभाग ४.१२ टक्क्य़ांनी वाढून १,८२५.९० रुपयांवर पोहोचला. सत्रात त्याने वार्षिक मूल्यउच्चांक नोंदविला. तर ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचे समभागमूल्य ३.७५ टक्क्य़ांनी वाढत ७,५४२.८५ रुपयांवर पोहोचले. सत्रात त्याचे मूल्य जवळपास ६ टक्क्य़ांनी वाढले होते.