नरमलेला बाजार आणि डळमळलेल्या अर्थव्यवस्थेचा ग्राहकोपयोगी उत्पादनांतील देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या जुलै ते सप्टेंबर २०१५ या दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीत स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसून आले. भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेचा मापदंड म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कंपनीच्या तिमाही नफ्यातील ९.८८ टक्क्यांच्या घट दाखविणाऱ्या निकालाने भांडवली बाजारावर निराशा पसरल्याचे बुधवारी झालेल्या व्यवहारातून दिसून आले.
देशाच्या ग्रामीण क्षेत्राची एक बाजारपेठ म्हणून घडणी करण्यात प्रमुख भूमिका राहिलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या एकूण विक्रीत ग्रामीण क्षेत्राचा ३५ टक्केहिस्सा आहे. परंतु देशभरात सर्वत्रच अनियमित राहिलेला पाऊस, मोठय़ा भागावरील दुष्काळ-छाया, त्यातच डाळी, कांदा व एकूण अन्नधान्याच्या किमतीतील वाढीमुळे मंदावलेल्या मागणीचा स्पष्ट प्रत्यय कंपनीने बुधवारी जाहीर केलेल्या कामगिरीतून दिसून येतो.
मागणीला चालना मिळेल म्हणून कंपनीने आपल्या साबण आणि त्यातही सर्वाधिक खपाच्या ‘लक्स’ तसेच डिर्टजट उत्पादनांच्या किमती कमी केल्या. त्यातून तिमाहीतील विक्री आधीच्या वर्षांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढली. कंपनीचे विक्री उत्पन्नही तुलनेत ५ टक्क्यांनी वाढले. पण त्याच वेळी जाहिरातींवरील खर्चही वाढल्याने नफ्याला मात्र कात्री लागली.
कंपनीने सरलेल्या तिमाहीत एकत्रित स्वरूपात ९६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला जो आधीच्या वर्षांच्या या तिमाहीच्या तुलनेत ९.८८ टक्क्यांनी घटला आहे.

समभाग मूल्यही डळमळले!
नफ्यात घटीच्या या कामगिरीमुळे मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग १.८५ टक्क्यांनी घटून ७९७.४० रुपयांवर स्थिरावला. दिवसाच्या व्यवहारात समभागाने ७८८.१५ अशा तीन टक्क्यांपर्यंत घसरगुंडी उडालेल्या नीचांकाला गवसणी घातली आहे. प्रमुख निर्देशांकांमध्ये भारदस्त स्थान असलेल्या समभागाच्या घसरणीची सबंध बाजारातील व्यवहारही मंदावल्याचे दिसून आले.