ईदनिमित्त अन्य सर्व प्रमुख बाजार बंद असल्याने भांडवली बाजारातही गुरुवारी व्यवहारादरम्यान सुट्टीचे वातावरण दिसून आले. परिणामी किरकोळ उलाढालीसह सेन्सेक्स तसेच निफ्टीने किरकोळ घसरण नोंदविली.
११.५९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,८३८.७१ वर तर ४.९० अंश घसरणीने निफ्टी ७,८६१.०५ वर थांबला. साप्ताहिक तुलनेत मात्र सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ३१९.४९ व ९९.१० अंशांनी वाढले आहेत.
बँकांच्या वाढत्या अनुत्पादित कर्जाबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेल्या चिंतेची छायाही बाजारात उमटली. व्यवहारात सेन्सेक्स २५,९२२.४७ तर निफ्टी ७,८८८.७५ पर्यंत वरच्या टप्प्यावर पोहोचला होता.
बँक निर्देशांक सर्वाधिक ०.४२ टक्के घसरला. तर आयसीआयसीआय बँक (-१.५३%), पंजाब नॅशनल बँक (-०.९१%), स्टेट बँक (-०.५४%) हे समभाग घसरले. बँकांबरोबरच मारुती सुझुकी, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज, रिलायन्स, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, ल्युपिन, टाटा स्टील हेही घसरले. ग्राहकोपयोगी उत्पादन निर्देशांक ०.९१ टक्के घसरणीत राहिला.