कर्जदार ग्राहकांची संख्या आणि त्यांनी उचललेल्या कर्जाचे मूल्य अशा दोन्हीबाबत ऑक्टोबरमध्ये घरांसाठी कर्ज वितरणात विक्रमी वाढ झाली असल्याचा आयसीआयसीआय बँकेने बुधवारी दावा केला.

करोना साथीचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम पाहता, उद्योगधंद्यांना जोखीमयुक्त वित्त पुरवठय़ाच्या तुलनेत कमी जोखमीच्या गृह कर्जासारख्या तारण कर्ज प्रकारांकडे सर्व बँकांनी होरा वळविला असून, देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने मालमत्ता तारण कर्जामध्ये दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे आणि सरलेल्या ऑक्टोबरमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कर्ज वितरण झाले असल्याचे सांगितले.

घरांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे ठळकपणे दिसून येत आहे, असे आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी पत्रकारांशी झालेल्या संवादात सांगितले. घराची खरेदी परवडण्याजोगी झाल्या असल्यामुळे असेल, परंतु सप्टेंबरच्या तुलनेत ग्राहकांच्या संख्येतील वाढ खूपच जास्त आहे आणि त्यांच्या कर्ज मागणी व मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी डिजिटल वाहिन्यांचा बँकेने वापर सुरू केला असल्याचे बागची यांनी स्पष्ट केले.

व्याजाचे दर खाली आले आहेत, मात्र घरइच्छुकांना जास्तीत जास्त रकमेचे म्हणजे अन्य बँकांच्या तुलनेत पाच ते १० टक्के अधिक कर्ज मंजूर करण्याचे प्रयत्नही आयसीआयसीआय बँकेसाठी फलदायी ठरले आहेत, असे बागची यांनी सांगितले. मात्र गृह कर्जामध्ये वाढीचे नेमके लक्ष्य सांगण्यास बागची यांनी नकार दर्शविला. या कर्ज प्रकारावर आक्रमकपणे भर दिला जाईल, इतकेच त्यांनी सांगितले.