गृहकर्जही तुम्हाला बरेच काही देऊ शकेल..
एका सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीचे सर्वात मोठे कर्जदायित्व हे घरासाठी घेतलेले कर्ज हेच असल्याचे बहुतांबाबत आढळून येईल. अनेकांचा संपूर्ण कमावता काळ हा गृहकर्जाचे हप्ते चुकते करण्यात जातो. कुणाही व्यक्तीला कर्जाचे ओझे नको असते व त्यापासून मुक्त व्हावे अशीच त्याची स्वाभाविक अपेक्षा असते. कर्जभाराने मुक्त स्वमालकीचे घर ही कल्पना त्यांच्यासाठी निश्चितच सुखावणारी असते.
परंतु आपले जीवन सरळमार्गी नसते. असे तंगीचे प्रसंगही येतात जेव्हा महिन्याच्या ठरलेल्या हप्त्याची रक्कम जुळवितानाही नाकी नऊ येतात, तर कधी अचानक मोठा आर्थिक लाभ होतो व कर्जफेड आंशिक का होईना लवकर करण्याचा मोह होतो. अशा प्रसंगी सामान्यपणे उभे राहणारे प्रश्न व त्यांचे समाधान असे-

वरकड मिळालेल्या रकमेचा कर्जफेडीसाठी वापर
नियमित कमाईव्यतिरिक्त मध्येच मोठा आर्थिक लाभाचे प्रसंग क्वचितच येतात. हाती लागलेल्या या घबाडातून शक्य तितके कर्ज चुकते करावेसे वाटते. कर्जभार हलका करावा, बरोबरीने कर्जाची उरलेली मुदतही कमी करावी, असा विचार यामागे असतो; परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी काही अन्य घटकही लक्षात घ्यावेत.
एकदा केलेली कर्जफेडीची कृती उलटवता येणार नाही आणि त्यासाठी वापरलेली रक्कम परत मिळविण्याची संधी तुमच्याकडे नसेल. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगांना उपयोगी यासाठी योजलेला निधी म्हणून ती वापरता येणार नाही. अथवा जसा आकस्मिक धनलाभ झाला, तशीच अचानक चालून आलेल्या संधीसाठी त्या रकमेचा वापराचा मोकाही आपण गमावून बसू.
गृहकर्जाच्या व्याज व मुद्दल परतफेडीवर तुम्हाला करवजावटीचा लाभ मिळत आहे, हेही ध्यानात असू द्यावे. त्यामुळे मिळालेल्या रकमेतून कर्जफेड करावी की गृहकर्जासाठी पडणाऱ्या व्याजदरापेक्षा अधिक परतावा देणारी करमुक्त गुंतवणूक करावी? असा पेच तुमच्यापुढे असेल. पण अशी गुंतवणूक तुम्हाला आíथकदृष्टय़ा सक्षम बनविणारी आणि गरज पडेल तेव्हा तुम्हाला रोकडसुलभता देणारी निश्चितच ठरेल.
गृहकर्ज जर स्थिर व्याजदर (फिक्स्ड रेट) प्रकारातील असेल तर मुदतपूर्व परतफेड म्हणजे ठरावीक दंड रकमेचे दायित्वही तुमच्यावर येईल, हे ध्यानात असावे.

आंशिक परतफेड अन् कर्ज मुदतीत कपात
वरील घटक ध्यानात घेऊन जर तुम्ही पूर्णत: कर्जफेड न करता, आंशिक कर्जफेडीचा अखेर निर्णय घेतलात, तर तुमच्यापुढे दोन पर्याय असतील.
– आजवर जो मासिक परतफेडीचा हप्ता (ईएमआय) आहे, तो कायम ठेवावा, मात्र पूर्वनिर्धारित कर्जफेडीचा मुदत कालावधी मात्र कमी केला जावा.
– आंशिक कर्जफेडीने एकूण कर्ज मुद्दल घटल्याने, कर्जफेडीचा कालावधी न बदलता मासिक हप्ता म्हणून जाणारी रक्कम कमी करावी.
अर्थात यातील पहिला पर्याय आदर्श ठरेल; परंतु वर्तमानस्थितीत वाढलेला घरखर्च भागविणे तुमच्या मिळकतीपल्याड ठरत असेल, तर तुम्ही दुसऱ्या पर्यायाला पसंती देणे उचित ठरेल.

आणीबाणीच्या प्रसंगांसाठी सुसज्जता
गृहकर्ज ही आपली दीर्घ मुदतीची बांधीलकी असते आणि त्याबाबत कोणतीही कुचराई ही कर्जदाराच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणारी ठरते. दुसरे कर्ज मिळविताना अडचणीची ठरू शकते. जरी मिळविता आले तरी तुमचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन तुलनेने महागडे मिळेल.
तथापि, जीवन हे अनेक प्रकारच्या अनिश्चिततांचे एक चक्र असते. अनवस्था प्रसंग ओढवून मोठा आíथक भरुदड पडू शकेल व अशा समयी तुमची कर्जफेडीची क्षमता कमजोर होण्याचा संभव नाकारता येणार नाही. त्यामुळे किमान सहा महिन्यांच्या हप्त्याची रक्कम वेगळी काढून ती मुदत ठेवीत अथवा अन्य तरल गुंतवणूक पर्यायात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. बरोबरीनेच कुटुंबासाठी आरोग्य विम्याचे (मेडिक्लेम) संरक्षण घेण्यालाही प्राधान्य असावे. भविष्यातील आकस्मिकतांपासून चिंतामुक्ती देणाऱ्या तरतुदींव्यतिरिक्त जर काही शिल्लक राहत असेल तर ती शक्यतो मुदतपूर्व कर्जभार हलका करण्यासाठी वापरली जावी.
खरे तर कर्ज देतानाच, बँका व वित्तसंस्था विम्याचा हा घटक ध्यानात घेतात आणि कर्जमात्रा वाढवून देत असतात. अर्थात तुमच्या गरजांची पूर्तता हे पुरेसे संरक्षण मिळवीतच केली जावी असा विचार यामागे असतो.
त्यामुळे गृहकर्ज मिळविलेच आहे, तुमच्या या कर्जभाराला मूल्यप्राप्तीचे स्वरूप देण्यासाठी आणखी काही निर्णय तुम्हाला करावे लागतील त्यासाठी ही उजळणी तुमच्यासाठी उद्बोधक ठरली असेल हीच आशा.

कर्जाचे दुसऱ्या वित्तसंस्थेकडे हस्तांतरणापूर्वी..
तुमच्या विद्यमान कर्जदात्यापेक्षा कमी व्याजदराने गृहकर्ज दुसरी एखादी वित्तसंस्थेकडून तुम्हाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे हस्तांतरण करण्यापूर्वीही खालील पलू लक्षात घ्यावेत.
* नव्या कर्जदात्या संस्थेकडून आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क
* दस्तऐवजांसाठी भरावे लागणारे मुद्रांक शुल्क
न पेक्षा तुम्ही तुमच्या विद्यमान कर्जदात्या संस्थेशी संपर्क साधून व्याजाचे दर कमी करण्यास सांगू शकाल. हे तुम्हाला कर्ज हस्तांतरणासाठी वर नमूद खर्चापेक्षा कमी शुल्क भरून करणे कदाचित शक्यही ठरेल.

(लेखक एडेल्वाइज हौसिंग फायनान्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी)