रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजदर निर्णयाबाबतचे पतधोरण जाहीर होण्यास दिवसाचा अवधी असताना स्टेट बँकेने तिचा आधार दर ०.१० टक्क्याने वाढविल्याने राष्ट्रीयीकृत बँकेचे गृह, वाहन तसेच शैक्षणिक कर्ज व्याजदर महाग झाले आहेत. भारतीय स्टेट बँकेचा नवा आधार दर गुरुवारपासूनच ९.८० टक्के झाला आहे. आधार दर वाढल्याने बँकेचे नवे गृह व वाहन कर्ज ०.१५ ते ०.२० टक्क्यांनी वाढले आहे. याचबरोबर बँकेने ठेवींवरील व्याजदरही पाव टक्क्याने वाढविले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखण्याकरिता जुलैपासून रोकडटंचाई निर्माण केली गेल्यानंतरही स्टेट बँकेने व्याज दरवाढ केली नव्हती. उलट अन्य बँकांच्या व्याज दरवाढीचा कित्ता कायम होता. याउपरही स्टेट बँकेचा सर्वात कमी कर्ज व्याजदराचा दावा कायम होता. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे पहिले पतधोरण शुक्रवारी जाहीर होत आहे. सध्याचा वाढता महागाईचा दर पाहता मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी वर्तविली जात आहे.
गृह कर्ज    : नवीन दर    
१०.१०% (३० लाख रुपयांपर्यंत)
१०.३०% (३० लाखांपेक्षा अधिक)
वाहन कर्ज : वार्षिक १०.७५%
ठेवींवर व्याज : वार्षिक ०.२५ टक्क्यांपर्यंत (१७९ दिवस ते १० वर्षांपर्यंत)