ह्य़ुंदाईची क्रेटा, मारुती-सुझुकीची ब्रेझा आणि फोर्डच्या इकोस्पोर्टला तगडी स्पर्धा

भारतीय वाहन बाजारपेठेत सध्या दिसायला रूबाबदार व कामगिरीत दमदार अशा कॉम्पॅक एसयूव्ही गाडय़ांना मागणी असून गेल्या वर्षभरात या प्रकारच्या गाडय़ांच्या मागणीत ३५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. नेमकी हीच गोष्ट ध्यानात घेऊन आता होंडा या जपानी वाहन निर्मात्याने आपली पहिलीवहिली कॉम्पॅक एसयूव्ही ‘बीआर-व्ही’ बाजारपेठेत उतरवली आहे. याच श्रेणीतील ह्य़ुंदाईची क्रेटा, मारुती-सुझुकीची ब्रेझ्झा आणि फोर्डची इकोस्पोर्ट या गाडय़ांना बीआर-व्ही चांगलीच स्पर्धा देईल. ८.७५ लाख ते १२ लाख रुपयांदरम्यान निश्चित केली गेलेली बीआर व्हीची किंमतही स्पर्धात्मक आहे.

दमदार इंजिन आणि अत्यंत आरामदायी अशी होंडाच्या कारची ओळख आहे. भारतीय बाजारपेठेत होंडा ब्रियो आणि होंडा सिटी या दोन गाडय़ा सातत्याने सर्वाधिक पसंतीच्या ठरल्या आहेत. होंडाची सीआर-व्ही ही गाडी एसयूव्ही श्रेणीतील उत्तम गाडी मानली जाते. मात्र गेल्या वर्षभरात वाहन बाजारपेठेत कॉम्पॅक एसयूव्ही श्रेणीच्या गाडय़ांची मागणी वाढली आहे. फोर्ड इकोस्पोर्ट, फियाट अब्राथ यांच्यानंतर ह्य़ुंदाईने बाजारात आणलेल्या क्रेटाला चांगलीच पसंती मिळाली. क्रेटाला टक्कर देण्यासाठी मारुती-सुझुकीने व्हिटारा ब्रेझा ही कॉम्पॅक एसयूव्ही बाजारात आणली. गेल्या वर्षभरातील कॉम्पॅक एसयूव्ही श्रेणीतील गाडय़ांची बाजारपेठ ३५ टक्क्य़ांनी वाढली आहे.

या पाश्र्वभूमीवर आता कॉम्पॅक एसयूव्ही श्रेणीतील स्पर्धेला होंडा बीआर-व्हीच्या आगमनाने आणखी फोडणी दिली आहे. गुरुवारी नवी दिल्लीत आणि शुक्रवारी मुंबईत तिचे अनावरण झाले. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधन प्रकारांत ही गाडी उपलब्ध असून या श्रेणीतील गाडीत होंडाने पहिल्यांदाच पॅडल शिफ्ट गीयर्स दिले आहेत. यामुळे स्टिअरिंग व्हिलजवळ असलेल्या खटक्यांनी गीयर बदलता येतील. ही गाडी ऑटो ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध असेल.

भारतीय बाजारपेठेतील कॉम्पॅक एसयूव्हीची मागणी लक्षात घेऊन आम्ही ही बीआर-व्ही बाजारपेठेत उतरवत आहोत. होंडाच्या इतर वाहनांप्रमाणेच या गाडीलाही प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. तसेच या बीआर-व्हीच्या माध्यमातून आम्ही होंडाची ओळख जपण्याचा प्रयत्न केला आहे. या गाडीची कमीत कमी किंमत ८.७५ लाख असून गाडीचे सर्व सोयींनी युक्त मॉडेल १२ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असेल, अशी माहिती होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्यानेश्वर सेन यांनी दिली.