सदोष एअरबॅग आढळल्यामुळे जपानी होंडाने तिची ५७ हजारांहून अधिक वाहने माघारी घेण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. कंपनीने जानेवारी २०१२ ते जून २०१३ मध्ये तयार केलेल्या या वाहनांमध्ये सिटी, जॅझ व सिव्हिक या वाहनांचा समावेश आहे.
भारतात तयार करण्यात आलेल्या दोन सेदान व एक हॅचबॅक प्रकारातील या वाहनांची एकूण संख्या ५७,६७६ आहे. त्यामध्ये सिटीची ४९,५७२, जॅझची ७,५०४ व सिव्हिकची ६०० वाहने आहेत.
जागतिक स्तरावर अवलंबिण्यात येत असलेल्या वाहन माघार धोरणांनुसारच कंपनीने सध्याचा निर्णय घेतल्याचे होंडा कार्स इंडिया लिमिटेडने स्पष्ट केले आहे. या वाहनांमधील बदल ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता करून देण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या सेवा व विक्री दालनांमध्ये ही प्रक्रिया शनिवारपासूनच सुरू करण्यात येईल.
होंडाने यापूर्वी सप्टेंबर २०१५ मध्ये २.२४ लाख वाहनांची माघार घोषित केली होती. २००३ ते २०१२ दरम्यान तयार करण्यात आलेल्या उपरोक्त तीन वाहनांव्यतिरिक्त सीआर-व्ही या प्रीमियम श्रेणीतील एसयूव्हीचाही समावेश होता. यावेळी एअरबॅगचेच निमित्त होते. कंपनीने यानंतर गेल्याच वर्षांत, डिसेंबरमध्येही ९०,२१० वाहने माघारी बोलाविली होती.