पुढील सोमवारी, २९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. या अर्थसंकल्पात काय असू शकते, याचा ज्योतिषाच्या बाजूने वेध घेतला आहे पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक देवदत्त पाठक यांनी…
१४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२च्या भारताच्या लग्न कुंडलीनुसार सध्या भारताचे २०१५-१६ सालासाठी मकरेतील भाग्याचे व दशमातील कुंभेचे वर्ष चालू आहे. मकरेचा उच्चेश मंगळ आणि राशिपती शनि अनुक्रमे सध्या वृश्चिकेत व नंतर धनेत व शनि सध्या वृश्चिकेत आहे. मूळचा पत्रिकेतील शनि पराक्रमात त्याची दृष्टी भाग्यावर म्हणजेच चालू वर्षावर आहे. सध्याच्या वृश्चिकेच्या शनीची अशुभ दृष्टी चालू वर्षावर असल्याने आणि शनि X मंगळ कुयुती झाल्याने यावर्षी सादर होणारा अर्थसंकल्प हा प्रथमदर्शनी निराशा करणारा पण दूरदृष्टी असणारा असेल. भारताची रास कर्क, त्याचा नक्षत्राधिपती शनि हा मंगळाबरोबर सप्तम स्थानामध्ये असल्याने राशीच्या पंचमातील निर्मिती स्थानाशी संबंधित बराचसा पैसा नव्या योजना आणि मूलभूत क्षमता विकसनासाठी वळवला जाईल. त्यातून पेट्रोल, यंत्र, जहाज, भूगर्भ, गुप्तचर आणि कोळसा यासाठी जरा जास्तच रक्कम राखून ठेवताना सरकारी तिजोरीवर बोजा पडणार आहे. तर दारू, विडी, तंबाखूजन्य पदार्थावर अधिक भर तर मेडिकल सुविधा व औषधे ही अल्पप्रमाणात सरकार पातळीवर स्वस्त होतील. रेस, जुगार हे अधिक कराचे तर दारूगोळासाठी जास्त अनुशेष तर सर्व प्रकाराच्या चामड्याच्या व्यापारावर अधिक कर लागू होईल.
रवि, बुध, शुक्र हे कलेचे कारक गृहांच्या संबंधित कला व तंत्र यांच्या मानधनावरही टॅक्सिंग होण्याची शक्यता असून, त्यातून कलाकारांच्या भविष्य निर्वाहाची योजना कार्यान्वित होऊ शकते. खासगी चॅनेल्स, शिक्षणसंस्था यांच्यावरील करप्रणाली जास्ती जाचक ठरल्यामुळे त्यातील असंतोष वाढू शकतो. द्वितीय स्थानातील मूळ मंगळाचा चालू वर्षातील भाग्यस्थानाशी षडाष्टक होत असल्याने भाग्य राखण्यासाठी सुरक्षा, कायदा, ताबा रेषा व त्या संदर्भातले सर्व विभाग यांचे साठी जमा राशी वळविण्यात येईल. याचा ताण दैनंदिन गरजांच्या उपलब्धतेवर होणार आहे. सध्याच्या गोचर गुरुचाही सध्याच्या चालू वर्षाबरोबर षडाष्टक योग होत असल्याने संशोधन आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, रासायनिक उद्योग यासाठी जास्त धनराशी वापरण्यात येईल. एकूण ऑगस्टपर्यंतचे सहा महिने करप्रणाली तीव्र केल्याने त्रासदायक होऊन आर्थिक सुधारणा अखडतील तर नंतरच्या सहा महिन्यात गुरुबदल व चालू वर्ष बदलामुळे त्याचे २५-३० टक्के लक्षणीय फायदे भारताच्या कुंडलीप्रमाणे दिसून येतात.
सामान्य नागरिकांच्या दैनंदिन, सामाजिक, न्यायिक, सांस्कृतिक, कौटुंबिक गरजांची तोंड मिळवणी करण्यासाठी या वर्षीचे आर्थिक अंदाजपत्रक हे दही लावून त्याचे तूप मिळवण्यासाठी असलेल्या विरजणासारखे आहे. प्रसंगी केंद्रातील निर्णय मंडळाला आता कटूता प्राप्त करावी लागेल पण दूरदृष्टीने मात्र त्याचा फायदा मिळेल. जसे तूप मिळवण्यासाठी दह्यापासून ताक, ताकापासून लोणी, लोण्यापासून अंतिमतः तूप मिळवण्यासाठी या प्रक्रियेसारखा काही काळापुरता धीर सर्वांनाच ठेवावा लागेल. पण दही गट्टम न करता, यासाठी ऑगस्टमधील गुरु बदलाची वाट बघावी लागेल.
– देवदत्त पाठक
(नक्षत्र ज्योतिष अभ्यासक)