नवीन भूसंपादन कायदा, रेपो दरात वाढ आणि सीमेंट दरवाढीच्या परिणामाने आधीच कंबरडे मोडलेल्या बांधकाम उद्योगाची अस्तित्वासाठी धडपड..
संसदेने मंजूर केलेला नवीन भूसंपादन कायदा, त्या पाठोपाठ रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात केलेली पाव टक्क्यांची वाढ आणि सीमेंटच्या किमतीतील ३० टक्क्यांहून अधिक वाढ याचा आधीच मागणीअभावी आजार जडलेल्या गृहनिर्माण उद्योगाला मोठा दणका बसणार असून, जनसामान्यांचे घरांचे स्वप्न किमतीतील २० ते २५ टक्के वाढीमुळे भंग पावेल अशी चिन्हे आहेत.
उत्तरोत्तर गहिरे होत असलेले आर्थिक मंदीचे रूप, जीवनमानाच्या खर्चातील वाढ आणि त्या तुलनेत अत्यल्प वेतन सुधारणा, बरोबरीनेच व्याजाचे चढे दर या घटकांमुळे आम नागरिकांना स्वमालकीचे घरकुल असण्याच्या स्वप्नाला मुरड घालणे भाग ठरले आहे. आधीच अटीतटीची बाजारस्थिती असताना, रिझव्‍‌र्ह बँकेकडून अलीकडेच रेपो दरात आणखी पाव टक्क्यांची करण्यात आलेली वाढ पाहता, पगारदारांना गृहकर्ज मिळविणे आणखीच जिकिरीचे बनणार आहे. त्यातच संसदेने मंजूर केलेल्या नव्या भूसंपादन कायद्यामुळे जमिनीच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यावर उभ्या राहणाऱ्या घरांच्या किमती येत्या काही वर्षांत २०-२५ टक्क्यांनी वाढतील, असे मत स्थावर मालमत्ता उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नारेडको)’चे उपाध्यक्ष सुनील मंत्री यांनी व्यक्त केले.
बांधकाम विकसकांची शिखर संघटना ‘क्रेडाई’चे अध्यक्ष ललित कुमार जैन यांच्या मते, ‘‘सीमेंटच्या गोणीत ५० रुपयांची दरवाढ म्हणजे प्रतिचौरस फूट बांधकाम खर्च वाढून २५ रुपयांवर जाणे असा सरळ हिशेब आहे. खर्चातील ही वाढ विकसकांवर नव्हे तर अंतिमत: घरांच्या ग्राहकांवरच लादली जाईल.’’ जैन यांनी सीमेंटच्या किमतीतील या आकस्मिक मोठय़ा दरवाढीविरुद्ध स्पर्धा आयोगाकडे क्रेडाईकडून दाद मागितली जाईल, असेही संकेत दिले. स्पर्धा आयोगाने यापूर्वी सीमेंट कंपन्यांच्या अनुचित बाजारप्रथा आणि संगनमत साधून किमती फुगविण्याच्या प्रवृत्तीला मोठा दंड आकारून चाप लावला आहे.
सामान्य मध्यमवर्गीयांना बडय़ा शहरात स्वमालकीचे घर मिळविण्याची संधी देणारे परवडणाऱ्या किमतीतील गृहनिर्माण सद्यस्थितीत शक्य नसल्याचे मंत्री यांनी स्पष्ट केले. सर्व प्रकारच्या उद्योगांसह स्थावर मालमत्ता उद्योगापुढेही रोखीची तीव्र चणचण, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि विक्रीतील घसरण ही आव्हाने असून, त्यातून दिलासा मिळण्याऐवजी उत्तरोत्तर संकटे वाढतच चालली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.