News Flash

गृहनिर्माण संस्थांना स्मार्ट तोंडावळा

‘एनएनएम’चे एक लाख ग्राहकांचे लक्ष्य

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एनएनएमचे एक लाख ग्राहकांचे लक्ष्य

आपले घर, कुटुंब आणि शेजारपाजार हेच अनेक शहरवासीयांचे छोटेसे विश्व असते आणि आपला व शेजाऱ्यांचा स्नेहबंध आणि उत्तम सह-अस्तित्व साकारण्यात गृहनिर्माण संस्थांची मोलाची भूमिका असते. या पाश्र्वभूमीवर सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या सभासदांच्या हितासाठी सुशासित व्यवस्थापन, पारदर्शी हिशेब तसेच सुरक्षित, सुसंवादी वातावरणासाठी मदतकारक ‘सोसायटी एन मोर’च्या तंत्रज्ञानाधारित सेवेने मूळ धरले. २०१५ सालच्या उत्तरार्धात स्थापित या नवउद्योगी उपक्रमाने अल्पावधीत पाच शहरांतील २०० सहकारी गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या २५ हजारांहून अधिक सदस्यांना आपल्या स्मार्ट सेवासुविधांचा प्रत्यय दिला. वाढती लोकप्रियता पाहता, वर्षभरात चारपटीने वाढीसह लाभार्थी सदस्य संख्या लाखभरावर नेण्याचे आता त्यांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांना सॉफ्टवेअर प्रणाली आणि मोबाइल अ‍ॅपआधारित सेवा ‘सोसायटी एन मोर (एसएनएम)’द्वारे पुरविल्या जातात. सहकारी कायद्याच्या उपविधींनुरूप सामान्य प्रशासन इतकेच नव्हे तर परस्पर संवाद व संपर्काचे काम ऑनलाइन धाटणीने या सेवेतून केले जाते. मुंबईत जवळपास ९० हजार सहकारी गृहनिर्माण संस्था असून, उंच मनोऱ्यांनी मिळून बनलेल्या टाऊनशिप्सच्या नवीन रचनांमुळे एका गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांची संख्याही वाढत आली आहे. यातून संस्थेचे सुशासित व्यवस्थापन ही अवघड बाब बनत असल्याचे ध्यानात आल्यानेच, एसएनएम या नवोद्योगी उपक्रमाची कल्पना पुढे आली, असे सोसायटी एन मोरच्या संस्थापिका व मुख्याधिकारी साक्षी सुरेखा यांनी स्पष्ट केले. संस्थेकडून स्वीकारल्या जाणाऱ्या सेवांच्या पॅकेजनुरूप प्रत्येक घरामागे महिन्याला ५ ते १५ रुपये इतके किफायती शुल्क आकारून एसएनएमकडून या सेवा दिल्या जातात. जाते.

प्रत्येक नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेला दरसाल प्राप्तिकर तसेच टीडीएस विवरण पत्र आणि लेखापरीक्षित ताळेबंद सादर करणे बंधनकारक आहे. या कामापासून एसएनएमने सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने शेजाऱ्यांना एकत्र आणून आदर्श सह-निवासाचा दुवा म्हणून गृहनिर्माण संस्थेकडून जे काही केले जाऊ  शकेल, त्या प्रत्येकाचा आपल्या सेवेत अंतर्भाव होत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभासदांना मासिक मेटेनन्स बिलाचे मोबाइल तसेच ई-मेल संदेशाद्वारे नियमित विवरण व स्मरण करून देणे, बिलांचा भरणा ऑनलाइन नेटबँकिग, कार्डद्वारे भरण्याची सुविधा, तसेच कार्यकारी मंडळाला व प्रत्येक सदस्याला बँक खात्यातील शिलकीचा तपशील, मुदतपूर्ती होत आलेल्या मुदत ठेवींचे स्मरण, तसेच संस्थेचा जमा-खर्चाचा हिशेब त्यांच्या सोयीनुसार केव्हाही ऑनलाइन तपासता येईल अशी पारदर्शकताही एसएनएमच्या सेवेमुळे शक्य बनली आहे. त्याचप्रमाणे एसएनएमचे मोबाइल अ‍ॅप हे सर्व सभासदांसाठी एक बंदिस्त समाजमाध्यम व्यासपीठ म्हणूनही कार्य करते. ज्यावर, सभासदांना त्यांचे संदेश, सुख-दु:खाच्या कार्यक्रमांची सूचना व निमंत्रणे, कार्यकारी मंडळाला सभासदांना उद्देशून नोटिसा, इतकेच नव्हे तर परिसरातील दूधवाला, वर्तमानपत्र विक्रेते, इस्त्रीवाला, न्हावी, हार-फुले विक्रेते तत्सम उपयुक्त सेवांसह, परिसरातील उपाहारगृहे, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल्समधील ग्राहकांसाठी असलेल्या योजनांचा तपशीलही अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होईल.

एसएनएमच्या सेवा मुंबईतील दीडशेहून अधिक नामांकित सोसायटय़ांकडून सध्या वापरात असून, त्यांचा याबाबतचा उत्तम अनुभव पाहता, निरंतर नव्या संस्थांकडून एसएनएमच्या सेवेबाबत चौकशी सुरू असते. आपला विक्रेता संघ मोफत प्रात्यक्षिकांसाठी विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये जात असतो, असेही साक्षी यांनी स्पष्ट केले. एकंदर या व्यवसायाच्या वाढीचा दर खूपच उत्साहवर्धक असून, आगामी दोन वर्षांत मुंबई, अहमदाबाद, कोलकाता आणि पुण्यातील २० टक्क्यांहून अधिक गृहनिर्माण संस्थांमध्ये एसएनएमच्या सेवांचा वापर सुरू झालेला पाहण्याचे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:07 am

Web Title: housing institute nnm
Next Stories
1 स्मॉल-मिड कॅप समभागांत पडझड सुरूच!
2 भांडवली बाजारात विक्रीला जोर; सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण!
3 एस्सार शिपिंगकडून पॅनामॅक्स मालवाहू जहाजाचे अधिग्रहण
Just Now!
X