मुंबई व महानगर क्षेत्र असा भेद न करता मुख्य मुंबई शहरात स्वस्तात घरे बांधण्याचे मला महिन्याभरात लेखी आश्वासन द्या, मी तुम्हाला भेडसावणारी कर समस्या दूर करतो, असे जाहीर आवाहन राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी विकासकांना केले.
‘एमसीएचआय-क्रेडाई’च्या रौप्य महोत्सवी स्थावर मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन मेहता यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी व्यासपीठावर स्थावर मालमत्ता संघटनेचे अध्यक्ष धर्मेश जैन, उपाध्यक्ष बंदिश अजमेरा, हाऊसिंग.कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ गुप्ता उपस्थित होते.
विकासकांना भेडसावणाऱ्या प्रकल्प मंजुरीत दिरंगाई तसेच वाढते कर यांचा पाढा या वेळी जैन यांनी वाचला. त्यावर, विकासकांनी केवळ मुंबई शहरात ११ लाख माफक दरातील घरे २०२२ पर्यंत उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन महिन्याभरात दिले तर आपण विकासकांवरील कर निश्चितच कमी करू, असे मेहता यांनी सांगितले.