आर्थिक मंदीचे काहीसे सावट अनुभवलेल्या देशातील गृहनिर्माण क्षेत्रासाठी सरलेले २०१२ साल वर्षांत नव्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या संख्येत तसेच घरांच्या विक्रीतही लक्षणीय घट नोंदविणारे राहिले. या कालावधीत घरांची विक्री १६ टक्के तर नव्या प्रकल्पांची संख्या ३० टक्क्यांनी खाली आली आहे.
जमिनीचे चढे दर व बँकांकडून अपेक्षित व्याजदर कपात न झाल्याचा विपरीत परिणाम या क्षेत्राने अनुभवला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नईसारख्या शहरांमध्ये याचा प्रतिकूलतेचा सर्वाधिक परिणाम दिसून आला.
गृहनिर्माण क्षेत्रातील घडामोडींचे मोजमाप ठेवणाऱ्या ‘नाईट फ्रॅन्क’ने याबाबतचा अहवाल जाहीर करताना, देशातील प्रमुख सहा शहरातील घरांची विक्री २.१ लाखांवर आली असून वार्षिक तुलनेत त्यात यंदा १६ टक्क्यांची घट झाली आहे. तर विविध कारणांमुळे नव्या प्रकल्पांपासून विकासक दूर राहिल्याने त्यांची संख्याही २०११ च्या तुलनेत तब्बल ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. २०११ मध्ये हेच प्रमाण ७ टक्के घसरते होते.
प्रमुख सहा शहरांमध्ये गेल्या वर्षांत २,४१,८११ घरे निर्माण झाली. २०११ मध्ये ही संख्या ३,४३,१४२ होती. घरांची विक्रीही २०११ मधील २,४९,१२७ वरून २०१२ मध्ये २,०९,७८७ वर येऊन ठेपल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
जुलै २०१० पासून बँकांकडूनही वित्त पुरवठय़ाचा ओघ कायम होता, असे नमूद करून अहवालात ही स्थिती जून २०१२ पर्यंत कायम होती, असे स्पष्ट करण्यात आले. यानंतर मात्र परिस्थितीत आमुलाग्र बदल झाल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.