एका मर्यादेपलिकडे दूरसंचार सेवा परवाना राखणाऱ्या कंपन्यांवर एकरकमी शुल्क अदा करण्याबाबत केंद्र सरकारने गुरुवारी निर्णय घेऊन काढलेल्या फर्मानामुळे भारती, व्होडाफोनकडून येत्या काही दिवसात मोबाइलचे दर वाढविले जाण्याची अटकळ आहे. येत्या आठवडय़ात होणार असलेल्या टूजी स्पेक्ट्रम लिलावानंतर ३० टक्क्यांच्या दरवाढीचे संकेत देणाऱ्या दूरसंचार कंपन्यांनी नव्या शुल्कापोटीची मात्राही ग्राहकांकडूनच वसुल केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दोन महिन्यांपूर्वीच रिलायन्स, आयडियासारख्या कंपन्यांनी कॉल दर २५ टक्क्यांहून अधिक वाढविले होते. भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर, रिलायन्स, टाटा, एमटीएनएल, बीएसएनएल यांच्यासारख्या कंपन्यांवर या नव्या शुल्काचा परिणाम होणार असून त्यांना नजीकच्या दिवसात आपले कॉल रेट वाढवावे लागणार आहेत. मात्र या स्वरुपातील दरवाढ किती असेल, हे आताच सांगता येणार नाही.
नव्या शुल्क प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी देणाच्या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत ३१,००० कोटी रुपयांची भर पडणार असली तरी त्याचा बोजा मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांवरच पडणार आहे. तो काही प्रमाणात ग्राहकांवर सोपविण्यासाठी कंपन्या आता मोबाइलचे कॉल रेट वाढविण्याची तयारी करू लागल्या आहेत.