|| वसंत माधव कुळकर्णी

बाजार नियंत्रक ‘सेबी’ने फंडांचे वर्गीकरण करून ‘फोकस्ड फंड’ हा एक नवीन प्रकार गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक फंड घराण्याला सेबीच्या आदेशानुसार एका फंड प्रकारात फक्त एकच फंड उपलब्ध करून देण्याचे बंधन असल्याने फंड घराण्यांनी आपल्या उपलब्ध फंडांचे नवीन नियमानुसार वर्गीकरण केले आहे. एखाद्या विशिष्ट फंड गटात फंड उपलब्ध नसल्यास फंड घराणी नवीन फंड योजना गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देत आहेत. एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंड घराण्याचा फोकस्ड फंड या प्रकारात फंड नसल्याने या फंड घराण्याचा ‘एल अ‍ॅण्ड टी फोकस्ड फंड’ हा फंड गुंतवणुकीसाठी सोमवारपासून खुला होत आहे.

लार्ज कॅप किंवा लार्ज अ‍ॅण्ड मिड कॅप फंडात ५०च्या आसपास समभाग असतात, तर मिड कॅप आणि मिड अ‍ॅण्ड स्मॉल कॅप फंड प्रकारात समभागांची संख्या त्याहून अधिक असते. गुंतवणुकीतील जोखीम समभाग गुंतवणुकीत वैविध्य आणून कमी करण्याचा निधी व्यवस्थापकाचा यामागे प्रयत्न असतो. परंतु जे गुंतवणूकदार जोखीम स्वीकारून अधिक नफा कमावू इच्छितात त्यांच्यासाठी सेबीने फोकस्ड फंड हा एक नवीन प्रकार गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक फोकस्ड फंडाच्या गुंतवणुकीत समभागांची संख्या ३० पेक्षा अधिक न राखण्याचे बंधन निधी व्यवस्थापकावर असते. समभागकेंद्रित जोखीम स्वीकारून परतावा मिळविण्याचे हे एक साधन आहे.

एल अ‍ॅण्ड टी फोकस्ड फंड हा गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला फंड असून त्यात समभागांची संख्या ३० पेक्षा अधिक असणार नाही. फंडाची गुंतवणूक मल्टी कॅप प्रकारची राहणार असून विशिष्ट उद्योग क्षेत्र निवडण्याचे किंवा वगळण्याचे बंधन निधी व्यवस्थापकावर नसेल. निधी व्यवस्थापकाला त्याच्या पूर्व अनुभवावर आधारित ३० समभागात आपल्या पसंतीच्या प्रमाणात गुंतवणुकीचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. समभाग निवडीसाठी ‘बॉटम अप सिलेक्शन’ हे धोरण वापरण्यात येणार आहे. समभाग निवडीसाठी ‘टॉप डाऊन अप्रोच’ प्रकारात ‘इकॉनॉमी’, ‘इंडस्ट्री’ आणि ‘कंपनी’ (ईआयसी मॉडेल) या क्रमाने समभागांची निवड केली जाते, तर ‘बॉटम अप स्टॉक सिलेक्शन’ पद्धतीत पहिल्या दोन गोष्टींना प्राधान्य न देता केवळ कंपनीच आणि कंपनीचे मूल्यांकन या वर लक्ष केंद्रित करून समभागांची गुंतवणुकीत निवड केली जाते. सर्वसाधारणपणे मिडकॅप आणि स्मॉल कॅप फंडांसाठी ‘बॉटम अप स्टॉक सिलेक्शन’ वापरले जाते.

एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) सौमेंद्र नाथ लाहिरी हे एल अ‍ॅण्ड टी फोकस्ड फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. एखाद्या नवीन फंडाची निवड करतांना निधी व्यवस्थापकाचे पूर्वकर्तृत्व तो निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांच्या परताव्यावरून पडताळता येते. सौमेंद्र नाथ लाहिरी हे कसलेले फंड व्यवस्थापक समजले जातात. लाहिरी यांना निधी व्यवस्थापनाचा २७ वर्षांचा अनुभव आहे. ‘डीएसपी टायगर’, ‘डीएसपी स्मॉल अ‍ॅण्ड मिड कॅप’, ‘डीएसपी मायक्रो कॅप’, आणि कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सीफाइड, कॅनरा रोबेको इमर्जिग इक्विटी, कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर, कॅनरा रोबेको ‘फोर्स’ या फंडांचे निधी व्यवस्थापन लाहिरी यांनी त्या त्या फंड घराण्यांच्या सेवेत असताना वेगवेगळ्या काळात पाहिले आहे. लाहिरी सप्टेंबर २०१२ पासून एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) म्हणून काम पाहत आहेत. मिड अ‍ॅड स्मॉल कॅप प्रकारच्या समभाग गुंतवणुकीचे किमयागार अशी लाहिरी यांची ओळख आहे. एल अ‍ॅण्ड टी मिडकॅप, एल अ‍ॅण्ड टी इमर्जिग बिझनेसेस, एल अ‍ॅण्ड टी लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंड, एल अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फंड त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देतात. सप्टेंबरअखेरीस संपलेल्या तिमाहीत मालमत्तेच्या दैनंदिन सरासरीनुसार एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाचा ‘टॉप टेन’ समभाग मालमत्ता असणाऱ्या म्युच्युअल फंडात समावेश झाला आहे. एल अ‍ॅण्ड टी फायनान्शियल होल्डग्जसारखा प्रवर्तक कैलास कुलकर्णी यांच्यासारखे नेतृत्व आणि लाहिरी यांच्या सारखा निधी व्यवस्थापक लाभल्याने दसऱ्याच्या दिवशी सोन्याऐवजी सोन्यासारख्या फंडात गुंतवणुकीसाठी ही शिफारस.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)