तमाम अर्थव्यवस्थेवर मंदीचे मळभ कायम असले तरी आर्थिक राजधानीतील व्यावसायिक विश्लेषकांवर मात्र पैशांचा पाऊस पडत आहे. याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईत सरासरी एक व्यावसायिक विश्लेषक हा सरासरी महिन्याला लाखभर तरी वेतन घेतो.
‘जिगसॉ अकॅडमी अॅन्ड अॅनालिटीक्स इंडिया’ या नियतकालिकाच्या वतीने नमूद करण्यात आलेल्या ‘अॅनालिटीक्स प्लेसमेण्ट अॅन्ड सॅलरी -२०१३’ अहवालात मुंबई याबाबत पहिल्या क्रमांकावर आहे.  सर्वेक्षणानुसार, मुंबईतील व्यावसायिक विश्लेषकांना वर्षांला ११.४९ लाख रुपयांपर्यंतचा पगार दिला जात असून पाठोपाठ बंगळुरातील विश्लेषकांना सरासरी ११.३४  लाख रुपये पगार दिला जात आहे.
मुंबईमध्ये सर्वेक्षण केल्या गेलेल्या बहुतेक व्यक्ती (४०%) या वर्षांला ६ ते १५ लाख पगार घेणाऱ्या पगारदार शाखेमध्ये मोडतात. तर फक्त ७ टक्के व्यक्तींना २५ लाखांहून अधिक पगार दिला जातो.
सर्वेक्षणात केपिओ, आयटी कंपन्या, इन-हाऊस युनिट आणि निशे अॅनालिटीक्स कंपनी अशा ४ प्रकारच्या विश्लेषक संस्थांमधील अनुभवावर आधारित सरासरी पगारांचीही तुलना केली गेली आहे. केपीओ उद्योग प्राथमिक पातळीवरील हुद्यांवरच ५.६ लाख रुपयांपर्यंतचा उच्चतम सरासरी पगार देऊ करतो. अहवाल अॅनालिटीक्स प्रोफेशनल्स बनू इच्छिणाऱ्या, अॅनालिटीक्स प्रोफेशनल्स असणाऱ्या आणि कर्मचारी वर्ग या सर्वाकरिता आहे. या अहवालानुसार अॅनालिटीक्स व्यवसाय आणि डेटा सायन्टीस्ट्सना असलेल्या मागणीत वाढ झाली आहे. अॅनालिटीक्स कौशल्ये अंगी बाणवू इच्छीणारा विद्यार्थीगण आणि प्रोफेशनल्स यांच्याही संख्येत वाढ होताना दिसत आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्षांवर ‘जिगसॉ अकॅडमी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव वोहरा म्हणतात. व्यावसायिक विश्लेषकच्या क्षेत्रात येऊ इच्छीणाऱ्या कित्येक विद्यार्थी कोणती कंपनी जास्तीत-जास्त पगार देते किंवा किमान उद्योगात अनुभव वाढत जाईल तशी पगारातही वाढ होते का, एखादी लहान कंपनीत नोकरी करावी की एखाद्या मोठ्या आयटी कंपनीत सामील व्हावे, अशी विचारणा करतात.
‘अॅनालिटीक्स इंडिया मॅगझिन’चे  (एआयएम) संस्थापक भास्कर गुप्ता म्हणाले, सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांमध्ये सर्वसाधारणपणे किरकोळ विक्री, बीएफएसआय आणि युटीलिटी (दूरसंचार, ऊर्जा, तेल) अशा क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. ज्यांनी भरती प्रक्रियेमध्येच या कौशल्यांच्या महत्त्वावर भर दिला होता. याची परिणती म्हणून ‘बिझनेस स्कूल्स’नी देखील आपल्या पदवीधरांमध्ये ही कौशल्ये बाणवण्याची गरज ओळखून त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.
महत्त्वपूर्ण निरीक्षणे :
* फिलीपाईन्स आणि चीन या इतर आशियाई देशांच्या तुलनेत अॅनालिटीक्स आऊटसोर्सिंगकरिता भारत हे सर्वात जास्त प्राधान्यक्रम मिळणारे ठिकाण आहे. अॅनालिटीक्स (ज्याला केपीओचा एक भाग समजले जाते)मध्ये या देशांमध्ये सहजासहजी उपलब्ध नसणाऱ्या कौशल्यांची गरज असते जी गरज बीपीओला लागत नाही.
* प्रक्रियेतील तज्ज्ञता आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे भारतातील अॅनालिटीक्समधील गुणवत्तेला प्रचंड मागणी आहे. वेब अॅनालिटीक्स, सोशल मीडिया  अॅनालिटीक्सला प्रशिक्षित प्रोफेशनल्सची चणचण भासते आहे.
* भारतीय अॅनालिटीक्स सेवा पुरवठादारांना मॉडेल डेव्हलपमेण्ट, कन्सल्टींग आणि प्रोप्रायटरी आयपी बेस्ड सर्व्हिसेससारख्या सेवा पुरवण्यात आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
पगारांची तुलना :
* केपीओ हा अॅनालिटीक्समध्ये प्रवेश करण्याचा आíथकदृष्टया सर्वात लाभदायक पर्याय आहे आणि सरासरी दोन किंवा अधिक वर्षांमध्ये ४ वेगवेगळ्या क्लायण्ट्ससोबत आणि २ वेगवेगळ्या उद्योगांसोबत काम करता येत असल्याने त्याला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते.
* आयटी कंपन्या केपिओ मॉडेल्सचे अनुसरण करण्याचा आणि प्रवेश पातळीवरच आकर्षक पगार देऊन इंजिनीयरिंग कॉलेज, बी-स्कूल्समधून अॅनालिटीक्स मधील सर्वोत्कृष्ट गुणवत्तेला आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवेश पातळीवरील पगार ५.५ लाख रुपयांपर्यंत असून संचालकपदावर २३ लाख रुपये इतका आहे. कॅप्टीव्ह युनिट्स स्वतच्या उद्योग/व्यवसायाशी बांधील असल्याने तिथे इतर उद्योगांसोबत काम करण्याची संधी मिळत नाही. टिकवून ठेवण्याकरिता कॅप्टीव्ह युनिट्स जास्त पगार देतात.