प्लास्टिकच्या कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याच्या गरजेतून हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने मुंबईतील ३३ हजारांहून अधिक घरांचा सामावून घेणारा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) बरोबर भागिदारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने के-पूर्व (अंधेरी पूर्व), एच-पश्चिम (वांद्रे पश्चिम) आणि आर-उत्तर (दहिसर) या तीन प्रभागात ही मोहीम सुरू आहे.

तंत्रज्ञानावर आधारित या उपक्रमात सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे पुनर्वापर मूल्यानुसार वर्गीकरण केले गेल्याने पुनर्वापराची प्रक्रिया सुलभ व गतिमान होते. ‘स्वच्छ पारले अभियान’सारख्या नागरिकांच्या संघटनांकडून केल्या गेल्या जागरूकतेमुळे प्लास्टिकचा कचरा हा घरातूनच वर्गीकृत करण्याची पद्धती रुजू शकली आहे. या उपक्रमातून आजवर २५०० टन प्लास्टिकचा कोरडा कचरा गोळा होण्यास मदत झाली आहे आणि उपक्रमाला हातभार लावणाऱ्या ५०० हून अधिक सफाई साथींना (कचरावेचक) त्यायोगे उपजीविकेचे साधन मिळाले आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेची माहिती अलीकडेच ‘एचयूएल’कडून आयोजित आभासी गोलमेज परिषदेतून देण्यात आली. एचयूएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता परिषदेत बोलताना, ‘‘एक जबाबदार कंपनी या नात्याने प्लास्टिकच्या पर्यावरणदृष्टय़ा नुकसान नियंत्रित करताना, प्लास्टिकचे अर्थव्यवस्थेतील योगदान अबाधित राहावे, असा हा प्रयत्न आहे,’’ असे ते म्हणाले. मुंबईत अशा प्रकारचे उपक्रम संपूर्ण देशात राबविता येऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले. संपूर्ण भारतभरात १०० हून अधिक शहरांतील कलेक्शन आणि डिस्पोजल भागीदारांच्या मदतीने एचयूएल १ लाख टनांहून अधिक प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाटीस हातभार लावत आली आहे.