राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या स्थानिक संस्था कर(एलबीटी)विरोधात व्यापाऱ्यांच्या लढय़ाला आणखी धार आणण्यासाठी आता उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. बुधवारपासून मुंबईत घाऊक व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची घोषणा या आधीच केली आहे, तर २ मेपासून व्यापाऱ्यांच्या निवडक नेत्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
राज्यभरातील विविध ७५० व्यापारी संघटनांचा महासंघ असलेल्या ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र- फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी आणि अन्य ११ पदाधिकारी हे आझाद मैदानावर प्राणांतिक उपोषणाला बसतील, असे आज जाहीर करण्यात आले. बुधवारच्या मुंबईतील व्यापाऱ्यांच्या संपाला सुरुवात झाल्यानंतर, दुपारी १ ते ४ या दरम्यान सर्व संघटनांची आगामी व्यूहनीती ठरविण्यासाठी मुंबईत बैठक होत असून, या बैठकीत व्यापारी व दुकानदारांच्या संघटनांव्यतिरिक्त माथाडी कामगार, वाहतूकदार, हॉटेल्स व उपाहारगृहांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्व मंडळींनी व्यापाऱ्यांच्या एलबीटीविरोधातील आंदोलनाला आधीच पाठिंबा दर्शविला असून, त्यांच्या सक्रिय सहभागाविषयीचा निर्णय या बैठकीतून होणे अपेक्षित आहे. तर एलबीटीवर बहिष्कार म्हणून व्यापाऱ्यांनी राज्यभरात एलबीटी/ एलपीटीसाठी नोंदणीकडेही पाठ फिरविली असल्याची गुरनानी यांनी माहिती दिली.
तथापि, १ मेपासून सुरू होणाऱ्या बंदमध्ये किरकोळ विक्रेत्यांच्या सहभागाबाबत अद्याप सुस्पष्टता नसली तरी, औषधविक्री आणि दुधाच्या विक्रीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे गुरनानी यांनी स्पष्ट केले.