‘आयबॉल’ची भारतीय बाजारपेठेत करामत

संगणकीय सामग्रीच्या निर्मितीतील आघाडीच्या आयबॉलने कंपनीच्या ताफ्यातील पहिला लॅपटॉप बुधवारी नवी दिल्लीत सादर केला. मायक्रोसॉफ्ट व इंटेलच्या तांत्रिक सहकार्याद्वारे भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आलेल्या कॉम्पबुक नावाच्या या लॅपटॉपची किंमत ९,९९९ रुपये आहे.
नवी दिल्लीत अनोख्या किमतीत हे उत्पादन सादर करताना सॅमसिका मार्केटिंगचे अध्यक्ष जगदीप कपूर, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे सरव्यवस्थापक प्रियदर्शनी मोहापात्रा, इंटेलच्या दक्षिण आशियाचे विपणन संचालक संदीप अरोरा व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पाराशरांपुरिया आदी उपस्थित होते.
नव्या उत्पादनाच्या जोरावर कंपनीने चालू आर्थिक वर्षांत ३० टक्के महसूलवाढीचे लक्ष्य राखले आहे. आयबॉल कॉम्पबुक नाममुद्रेंतर्गत येत्या दिवाळीत आणखी दोन ते तीन उत्पादने सादर करण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
विण्डोज १० तंत्रज्ञानावरील ११.६ इंची स्क्रीन असलेल्या लॅपटॉपची किंमत ९,९९९ रुपये, तर १४ इंची स्क्रीनमधील लॅपटॉपचे मूल्य १३,९९९ रुपये आहे. एक लाख उत्पादनांच्या विक्रीचे उद्दिष्ट यानिमित्ताने जाहीर करण्यात आले. आयबॉलचे टॅबलेट व मोबाइल फोनही भारतीय बाजारपेठेत सध्या उपलब्ध आहेत.