11 August 2020

News Flash

देशातील पहिल्या ‘बुलियन एक्सचेंज’चा मार्ग सुकर!

प्रस्ताव मंचातून सोने व्यवहारांची पूर्तता करणाऱ्या विशिष्ट ‘बुलियन बँकां’चाही जन्म होऊ घातला आहे.

बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान आणि आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी शुक्रवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

बीएसई आणि ‘आयबीजेए’चा संयुक्त उपक्रम
केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी सूतोवाच केल्याप्रमाणे, देशातील पहिल्या वहिल्या मौल्यवान धातूच्या राष्ट्रीय विनिमय मंच (बुलियन एक्सचेंज) उभारण्यासाठी मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई आणि सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) यांच्या दरम्यान शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.
आयबीजेए आणि बीएसई यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार, प्रस्तावित विनिमय मंचासाठी विशेष हेतू उपक्रम स्थापण्यात येईल, ज्यात आयबीजेएचा ७० टक्के तर बीएसईचा ३० टक्के वाटा असेल. या करारावर आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज आणि बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी स्वाक्षऱ्या केल्या. उभयतांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे आवश्यक त्या परवान्यासाठी प्रस्ताव सादर केला असून, लवकरच त्याला मंजुरी मिळून या नव्या बाजारमंचाची पायाभरणी होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भारतात मौल्यवान धातूच्या उलाढाली करणारे सर्वच घटक अर्थात बँका, सोने व्यापारी, सराफ समुदाय यांची घाऊक खरेदी व विक्री या प्रस्तावित विनिमय मंचामार्फत होऊ लागल्यास, सरकारच्या दृष्टीने या व्यापारात अपेक्षित असलेली पारदर्शकता दिसून येऊ शकेल, असे या प्रसंगी बोलताना मोहिम कम्बोज यांनी सांगितले. संशयास्पद व र्दुव्‍यवहारांना पायबंद घातला जाईल यासाठी आवश्यक ती माहिती व नोंदी ठेवण्यास हा बाजारमंच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सोने व्यवहारात पारदर्शकता येईल!
आजवर सोन्याच्या किमतीचे वायदा व्यवहार देशात सुरू असून, त्या जागी भौतिक स्वरूपात धातूचे व्यवहार नव्या विनिमय मंचातून होऊ लागतील. सोन्याच्या वापराचा आणि उलाढालीचा नेमका अंदाज येण्यास सरकारी व्यवस्थेला त्यामुळे मदत मिळेल. देशात दरसाल सरासरी १००० टन सोन्याची अर्थात सुमारे २५०००० कोटी रुपये मूल्याचे सोने आयात होते. पण ते नेमके कुणाकडून वापरात येते, उलाढाल कशी होते याबाबत पुरती पारदर्शकता आणि अधिकृतरीत्या नोंदी ठेवणाऱ्या यंत्रणेचा अभाव आहे. विनिमय मंचामुळे त्यात सुसूत्रता येऊ आणि व्यवहारात पारदर्शकता येऊ शकेल. प्रस्ताव मंचातून सोने व्यवहारांची पूर्तता करणाऱ्या विशिष्ट ‘बुलियन बँकां’चाही जन्म होऊ घातला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 5:25 am

Web Title: ibja signs pact with bse for bullion exchange
टॅग Bse
Next Stories
1 प्रवासी कार विक्रीचा दरही दुहेरी आकडय़ात
2 ‘फेड’ भयाचा वेढा : सेन्सेक्स घसरून २५ हजाराखाली
3 सिमेंट कंपन्यांवरील कोटय़वधींचा दंड रद्दबातल
Just Now!
X