जागतिक तंत्रज्ञान कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्प अर्थात आयबीएमने युरोपातील प्रत्येक पाच नोकऱ्यांमागे एकाला कात्री लावून, तब्बल १० हजार नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू केली असल्याचे सूत्रांनी बुधवारी स्पष्ट केले. ब्रिटन आणि जर्मनीतील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या कपातीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आयबीएमने व्यावसायिक पुनर्रचनेच्या हाती घेतलेल्या योजनेनुसार, कंपनीचे दोन अंगांमध्ये विभाजन केले जाणार आहे. एकूणच मंदावलेल्या व्यावसायिक वातावरणात खर्चात कपातीच्या प्रयत्नांतून नोकरकपात अपरिहार्य ठरत असल्याचे कंपनीकडून सूचित केले गेले आहे. परिणामी, युरोपमधील २० टक्के नोकऱ्यांवर गदा येऊ घातली आहे. ब्रिटन, जर्मनीत कार्यरत कर्मचाऱ्यांपाठोपाठ, पोलंड, स्लोव्हाकिया, इटली आणि बेल्जियममधील कर्मचाऱ्यांना याचा जाच सोसावा लागणार आहे.

युरोपातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीतही हा नोकरकपातीचा प्रस्ताव आयबीएमकडून ठेवण्यात आला होता. या बैठका आणि वाटाघाटींचे स्वरूप अद्याप गोपनीय असून, त्या संबंधाने कर्मचारी संघटना किंवा कंपनीनेही अधिकृतपणे काहीही स्पष्ट केलेले नाही.