आयसीआयसीआय बँकेने  व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणी चौकशीसंबंधाने ‘एसएफआयओ’ अर्थात गंभीर गैरव्यवहार तपास कार्यालयाकडून अद्याप कोणतीही विनंती आलेली नाही, अशी माहिती या कार्यालयाचे पालकत्व असलेल्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

‘एसएफआयओ’ हे केंद्रीय कंपनी व्यवहार खात्यांतर्गत येते. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्याची परवानगी तपास कार्यालयाच्या  मुंबईतील यंत्रणेने दिल्ली मुख्यालयाकडे मागितल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले होते.

कंपनी व्यवहार खात्याचे सचिव आय. श्रीनिवास यांनी मात्र, ‘एसएफआयओ’कडून अशी कोणतीही परवानगीचे पत्र आले नसल्याचे सांगितले. या प्रकरणात रिझव्‍‌र्ह बँक तपास करत असल्याचेही ते म्हणाले. ‘एसएफआयओ’ला गरज भासली तरच कंपनी व्यवहार खात्याशी संपर्क साधला जाईल.

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याच्या प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी करीत आहे. तर प्राप्तिकर विभागानेही दीपक कोचर यांना मंगळवारी नोटीस बजावली आहे.