नफ्यात तब्बल ८७ टक्के घसरण; बुडित कर्जासाठी मोठी तरतूद
देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआ बँकेने शुक्रवारी गेल्या तिमाहीच्या नफ्यातील मोठय़ा घसरणीची धक्कादायक वाटचाल जाहीर केली. ४०६.७१ कोटी अशी घसघशीत रकमेची तरतूद बुडित कर्जाकरिता करावी लागल्याने बँकेचा तिमाही नफा ८७ टक्क्य़ांनी कोसळला आहे.
२०१५-१६ या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांतील जानेवारी ते मार्च या शेवटच्या तिमाहीतील ताळेबंद हा गेल्या दशकातील सुमार राहिला आहे. आयसीआयसीआयच्या एकूण – ढोबळबरोबरच केवळ बँकेचा नफा ७६ टक्क्य़ांनी घसरून चौथ्या तिमाहीत २,९२२ कोटी रुपयांवर आला आहे. मार्च २०१६ अखेरच्या तिमाहीत बँकेच्या एकूण बुडित कर्जाचे प्रमाण हे एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ५.८२ टक्के राहिले आहे. बँकेने ७,००० कोटी रुपये बुडित कर्जे दाखविले आहे.
बाजार व्यवहारात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या सूचिबद्ध आयसीआयसीआय बँकेचा समभाग शुक्रवारी १.५ टक्क्य़ांपर्यंत घसरला. त्याला दिवसअखेर २३६.६० रुपये भाव मिळाला.
बँकेने चालू आणि बचत खात्यांच्या (कासा) ठेवीत वर्षांकाठी १७% ची भर राखली आहे. ‘कासा’चे गुणोत्तर ३१ मार्च २०१६ पर्यंत ४५.८ टक्के नोंदले गेले आहे. बँकेचे विना व्याज उत्पन्न ४६ % ने वाढले असून चौथ्या तिमाहीत ते ५,१०९ कोटी रुपये झाले आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने मुंबईत शुक्रवारी झालेल्या बठकीत प्रत्येकी ५ रुपयाच्या प्रस्तावित शेअरचा लाभांशाला मंजुरी दिली. थकित कर्जाचा भार असलेल्या बँकेने लोह आणि स्टील, खनिजे, ऊर्जा, सिमेंट क्षेत्रातील कर्जदारांवरील ताणांवर उपाय शोधण्यासाठी बँक भविष्यात कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.

के. रामकुमार यांचा राजीनामा
नफ्यातील घसरणीचे तिमाही निष्कर्ष जाहीर करणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या कार्यकारी संचालकपदावरून के. रामकुमार हे पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी आता बँक समूहातीलच विजय चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समूहाच्या आयसीआयसीआय फाऊंडेशनचीही जबाबदारी पाहिलेले रामकुमार हे वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे कारण देण्यात आले आहे. तर समूहात गेल्या २३ वर्षांपासून असलेल्या चांडक यांनी कंपनी बँकिंग, प्रकल्प वित्त, किरकोळ मालमत्ता तसेच ग्रामीण बँकिंग विभाग हाताळले आहेत.

आंतरराष्ट्रीय मंदीच्या वातावरणाचा यंदा बँकेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका येथे स्थानिक बाजारपेठेतही कर्जदारांबाबत नोंदला गेला आहे.
– चंदा कोचर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीआयसीआय बँक.