खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी’च्या भांडवली बाजारात खुल्या सार्वजनिक समभाग विक्रीच्या प्रस्तावावर ‘सेबी’ने मंजुरीची मोहोर उमटविली आहे. भारतातील कोणत्याही विमा कंपनीकडून प्रस्तावित होणारी ही पहिली भागविक्री असेलच, शिवाय त्यातून उभारण्यात येणारी अंदाजे ५,००० कोटी रुपये पाहता मागील सहा वर्षांतील ही सर्वात मोठी भागविक्री ठरेल. दिवाळीच्या तोंडावर सामान्य गुंतवणूकदारांचा कौल कंपनीकडून आजमावला जाणे अपेक्षित आहे.

भारतातील खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक आणि ब्रिटनमधील प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्ज यांनी संयुक्त भागीदारीत सुरू केलेल्या या कंपनीने १८ जुलै रोजी सेबीकडे भागविक्रीचा प्रस्ताव दस्तऐवज दाखल केला होता. त्याला २ सप्टेंबरला बाजार नियंत्रकांकडून मंजुरी देण्यात आली आहे.

सिंगापूरस्थित खासगी गुंतवणूकदार संस्था टेमासेक आणि उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या ‘प्रेमजीइन्व्हेस्ट’ या कंपन्यांनाही आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफमध्ये भागधारक आहेत. आयसीआयसीआय बँकेकडे कंपनीतील ६८ टक्के, तर प्रुडेन्शियलचे २६ टक्के भागभांडवल आहे, उर्वरित सहा टक्के हिस्सा अन्य भागधारकांकडे आहे.

प्रस्तावित भागविक्रीमार्फत कंपनीच्या १८.१३ कोटी समभाग सार्वजनिक रूपात विकले जाणार आहेत. याचा अर्थ कंपनीच्या विद्यमान भागधारकांकडे असलेल्या १२.६५ टक्के भागभांडवलाची विक्री केली जाणार आहे. अर्थात कंपनीतील आपला भांडवली हिस्सा प्रुडेन्शियलकडून सौम्य केला जाणार नसल्याने, आयसीआयसीआय बँकेची कंपनीतील भांडवली मालकी १२.६५ टक्क्यांनी सौम्य होणार आहे.

विक्रीला खुल्या झालेल्या समभागांपैकी १० टक्के हिस्सा, म्हणजे १.८१ कोटी समभाग आयसीआयसीआय बँकेच्या विद्यमान भागधारकांना खरेदीसाठी आरक्षित असतील.

 

कोल इंडियानंतरची सर्वात मोठी भागविक्री

  • वर्ष २०१० मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा उत्पादक कोल इंडिया लिमिटेडने खुल्या भागविक्रीतून तब्बल १५,००० कोटी रुपये उभारले होते. त्यानंतरची सर्वात मोठी साधारण ५,००० कोटी रुपये उभारू इच्छिणारी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफची ही सर्वात मोठी भागविक्री असेल.

३२,५०० कोटींचे मूल्यांकन..

  • विमा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर २००१ मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचे कार्यान्वयन झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयसीआयसीआय बँकेने कंपनीतील सहा टक्केहिस्सा १,९५० कोटी रुपयांच्या मोबदल्यात टेमासेक आणि प्रेमजीइन्व्हेस्ट या कंपन्यांना प्रदान केला. ते पाहता कंपनीचे मूल्यांकन ३२,५०० कोटी रुपये होते. मार्च २०१६ अखेर तब्बल १,०३,९३९ कोटी रुपये मालमत्तेचे कंपनी व्यवस्थापन पाहत आहे.