मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाने १७ वर्ष पूर्ण केली असून, २१,१९५ कोटी रुपयांची एकूण व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (एयूएम) गुंतवणूकदारांकडून उभी केली आहे. म्युच्युअल फंड उद्योगातील मूल्याधारीत (व्हॅल्यू) योजनांच्या श्रेणीतील ३० टक्के मालमत्ता ही एकट्या या फंडाकडे आहे.

गुंतवणूक जर दीर्घ कालावधीकरिता असेल तर तिची परतावा कामगिरी चांगली असते, याचे उदाहरण म्हणून या फंडाकडे पाहता येईल. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेच्या स्थापनेच्या वेळी (२००४) मध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर ही रक्कम आज २२.१३ लाख रुपये झाली असेल. म्हणजेच या योजनेने २०.०३ टक्के वार्षिक सरासरी परतावा दिला आहे. सारख्याच कालावधीत निफ्टी ५० निर्देशांकाने १५.९१ टक्के दराने परतावा दिला आहे म्हणजेच गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे केवळ १२.२४ लाख रुपये झाले असते.

गेल्या तीन वर्षांत आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाने लार्ज कॅपवर लक्ष केंद्रित केले, असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शाह यांनी सांगितले. फंडाच्या पोर्टफोलियोत लार्जकॅप सर्वाधिक ७१.२४ टक्के, तर मिड आणि स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे १३.५८ टक्के आणि ३.४२ टक्के गुंतवणूक आहे. या तीन वर्षांत १८ समभाग कायम राहिले असून पोर्टफोलियोत त्यांचा हिस्सा ५१.९१ टक्के आहे.