21 January 2021

News Flash

आयडीबीआय बँकेचे संपादन सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्याचे ‘एलआयसी’चे लक्ष्य

सध्याच्या घडीला एलआयसीकडून वेगवेगळ्या गोष्टींची चाचपणी सुरू

दोन्ही बाजूच्या कर्मचारी-अधिकारी संघटनांनी विरोधासाठी कंबर कसली असतानाही, भारतीय आयुर्विमा महामंडळ – एलआयसीने थकीत कर्जाने ग्रस्त आयडीबीआय बँकेतील ५१ टक्के भागभांडवल हस्तगत करून ही बँक येत्या सप्टेंबरअखेपर्यंत ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विमा नियामक – ‘आयआरडीएआय’ने या संपादन व्यवहाराला गेल्या महिन्यात हिरवा कंदिल दिला आहे.

सध्याच्या घडीला एलआयसीकडून वेगवेगळ्या गोष्टींची चाचपणी सुरू असून, त्यात आयडीबीआय बँकेच्या एकूण ठेवी, स्थावर मालमत्ता, बँकेच्या थकीत कर्जाची स्थिती यांची मोजदाद सुरू आहे. त्याचप्रमाणे आयडीबीआय बँकेच्या किरकोळ भागधारकांकडून समभाग मिळविण्यासाठी एलआयसीकडून खुला प्रस्ताव दिला जाणार आहे.

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या कंपनीच्या संपादनविषयक नियमांनुसार, २५ टक्क्य़ांपेक्षा अधिक भागभांडवल संपादित करायचे झाल्यास, संपादन करू पाहणाऱ्या कंपनीने भागधारकांसाठी खुला प्रस्ताव आणणे बंधनकारक ठरते. एलआयसीचे सध्या आयडीबीआय बँकेत १०.८२ टक्के भागभांडवल असून, ते ५१ टक्क्य़ांपर्यंत वाढविले जाणार आहे.

विमाविषयक सध्याच्या नियमांनुसार, कोणत्याही विमा कंपनीला भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनीत कमाल १५ टक्के भागभांडवल राखता येते, तथापि आयआरडीएआयच्या हैदराबाद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत एलआयसी-आयडीबीआय बँक व्यवहारासंदर्भात हा नियम शिथिल केला गेला आहे. एलआयसीचा त्यामुळे बँकिंग क्षेत्रात प्रवेशाचा मानस पूर्ण होणार असून, आयडीबीआय बँकेसह देशभरातील २००० शाखांमधून विमा योजनांच्या विक्रीचे दालन खुले होईल, तर अडचणीत असलेल्या आयडीबीआय बँकेला सशक्त भांडवली मदत यातून मिळून संजीवनी दिली जाणार आहे.

मार्च तिमाहीअखेर आयडीबीआय बँकेचे सकल अनुत्पादित मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण ५५,६०० कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. तर याच तिमाहीत बँकेने ५,६६३ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2018 1:40 am

Web Title: idbi bank lic 2
Next Stories
1 आयडिया-व्होडाफोन विलीनीकरणाला अखेर मंजुरी
2 Good News : फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर
3 वाहन कंपन्यांची सणावाराच्या स्वागतासाठी सज्जता
Just Now!
X