बँकेच्या संचालक मंडळाकडून विक्री प्रस्ताव मंजूर

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आयडीबीआय बँकेच्या संचालक मंडळानेही आता विक्री प्रस्ताव पारीत करून, त्यावर  सरकारकडून मंजुरीची मोहर उमटण्याची मागणी केली आहे.

आयडीबीआय बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. हिस्सा विक्रीसाठी सरकारकडे परवानगी मागण्याचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला. याबाबतची माहिती बँकेने भांडवली बाजारालाही कळविली आहे.

मोठा कर्जभार असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेतील हिस्सा ५१ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास विमा नियामकाने एलआयसीला परवानगी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुर्विमा महामंडळाच्या सोमवारच्या संचालक मंडळ बैठकीत मान्य करण्यात आला. अशा प्रस्तावाचे पत्र बँकेला प्राप्त झाल्याचेही आयडीबीआयने म्हटले आहे.

बँकेच्या भागधारकांपुढे खुला प्रस्ताव ठेऊन हा हिस्सा खरेदी करण्याचा पर्याय एलआयसीने पुढे आणला आहे. ही प्रक्रिया येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची अटकळ आहे. सध्या बँकेत महामंडळाचा जवळपास ७.९८ टक्के हिस्सा आहे. तो ५१ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास विमा कंपनीला मुभा आहे. मात्र या सरकारी बँकांमधील हिस्सा ५१ टक्क्यांच्या खाली जाणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.